पुणे महापालिकेने बुजविले ७७७ खड्डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain forcast Pune Municipal Corporation filled 777 potholes Neglecting to fill potholes on minor roads

पुणे महापालिकेने बुजविले ७७७ खड्डे

पुणे : पावसाने विश्रांती घेतल्याने शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्यास गती आली आहे. गेल्या पाच दिवसात महापालिकेने ७७७ खड्डे बुजविले आहेत. मात्र, शहरातील प्रमुख रस्त्यांचे खड्डे मुख्य पथ विभागाकडून बुजविले जात असले तरी लहान रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याकडे क्षेत्रीय कार्यालयांकडून दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान, आज (शनिवारी) २९४ खड्डे बुजविण्यात आले. गेले वर्षभर सुरू असलेल्या विविध प्रकारच्या खोदकामामुळे यंदाच्या पावसात पुणेकरांना खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागत आहे. जलवाहिनी, सांडपाणी वाहिनी, मोबाईल कंपनीच्या केबल यासह इतर कारणासाठी रस्ते खोदाई केल्यानंतर पुन्हा रस्ते पुर्ववत करण्यात आले.

पण हे काम निकृष्ट पद्धतीने झाल्याचे वारंवार सांगूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, त्याचा त्रास पुणेकरांना भोगावा लागत आहे. तसेच नगरसेवकांनी मार्च महिन्यात त्यांची मुदत संपत असल्याने त्यापूर्वी निधी संपविण्यासाठी आपापल्या भागात डांबरीकरणाचा सपाटा लावला, पण हे कामही योग्य पद्धतीने न केल्याने या ठिकाणी अवघ्या तीन चार महिन्यात खड्डे पडण्यास सुरवात झाली. त्यामुळे आता ही कामे करणाऱ्या ठेकेदारांची कुंडली तयार करण्यात येणार आहे.

खड्ड्यांमुळे नागरिकांच्या तक्रारी येत असताना खड्डे बुजविण्याची गती कमी होती, पण आता पाऊस उघडल्याने वेग वाढला आहे. शनिवारी (ता. १६) २९४ खड्डे बुजविण्यात आले. यामध्ये कोथरूड, औंध, बाणेर, सिंहगड रस्ता, कात्रज या भागातील खड्डे जास्त बुजविण्यात आले आहेत. पण भर पावसात जे खड्डे बुजविले होते, तेथे पुन्हा खड्डे पडले असल्याने आता प्रशासनाला पुन्हा ते खड्डे बुजविण्याची नामुष्की येणार आहे. तसेच पेठांसह उपनगरांमधील क्षेत्रीय कार्यालयांची जबाबदारी असलेल्या लहान रस्‍त्यांवरील खड्डे बुजविले जात नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे.

पेठांमधील वेग मंदच

मध्यवर्ती पेठांमध्ये मोठे खड्डे पडले आहेत. आज दिवसभरात केवळ १८ खड्डे बुजविण्यात आले आहेत. प्रशासनाकडून केवळ मोठ्या रस्त्यांकडे लक्ष दिले जात असून, लहान रस्ते क्षेत्रीय कार्यालयांची असल्याने तेथील खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

तारीख व बुजविलेले खड्डे

१२ जुलै - ५३

१३ जुलै - ८८

१४ जुलै - १३९

१५ जुलै - २०३

१६ जुलै - २९४

Web Title: Rain Forcast Pune Municipal Corporation Filled 777 Potholes Neglecting To Fill Potholes On Minor Roads

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top