पुण्यात पावसाच्या दमदार सरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

शहरात 1 जून ते 31 जुलै या दोन महिन्यांमध्ये सरासरी 321.7 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदाच्या पावसाळ्यात 19.8 मिलीमीटर जास्त म्हणजे 341.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

पुणे - पुण्यात येत्या रविवारपासून (ता. 2) पुढील पाच दिवस पावसाच्या मध्यम सरी सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दम्यान, शुक्रवारी तासभर पडलेल्या पावसाने शहर आणि परिसरात गारवा निर्माण झाला. पुण्यात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथील वेधशाळेत आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

शहरात सकाळपासून अंशतः ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी झाली. प्रचंड उकाडा वाढला. कमाल तापमानाचा पारा 5.4 अंश सेल्सिअसने वाढून 33 अंश सेल्सिअस नोंदला गेला. वाढलेल्या या उष्णतेमुळे संध्याकाळी पाच वाजता ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. तासभर शहराच्या विविध भागात पावसाच्या मुसळधार सरी पडत होत्या. त्यामुळे रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. अचानक आलेल्या पावसामुळे दुचाकी चालकांची धांदल उडाली. पावसापासून बचाव करण्यसाठी मिळेल त्या ठिकाणी दुचाकी चालक थांबल्याचे चित्र दिसत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप       

शहरात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 8 मिलीमीटर पाऊस पडला. लोहगाव येथे मात्र पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. तेथे 0.2 मिलमीटर पाऊस नोंदला गेल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

सरासरीपेक्षा 19 मिलीमीटर जास्त पाऊस 
शहरात 1 जून ते 31 जुलै या दोन महिन्यांमध्ये सरासरी 321.7 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदाच्या पावसाळ्यात 19.8 मिलीमीटर जास्त म्हणजे 341.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात पावसाचा अंदाज 
शनिवार (ता. 1) : ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्‍यता 
रविवार ते गुरूवार (ता. 2 ते 6) : मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्‍यता 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain in pune