पाऊस, खड्ड्यांनी अडवला नगर, नाशिक मार्ग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात 
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच हमरस्त्यालगतच्या गटारांची स्वच्छता सार्वजनिक बांधकाम विभागाने करणे अपेक्षित असतानाही तसे होत नसल्याने नेमकी ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग की ग्रामपंचायत प्रशासनाची?, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दरम्यान, वढू चौकात पडलेले खड्डे बुजविण्याची जबाबदारीही सार्वजनिक बांधकाम खात्याची असताना कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीनेच वढू चौकात खडी व मुरूम टाकून दुरुस्ती केली. यापुढे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुरुस्तीबाबत ठोस उपाय न केल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पावसामुळे पुणे-नगर रस्त्यावर खड्डे व त्यात साठलेल्या पाण्यामुळे झालेले अपघात व आठवडे बाजाराची गर्दी, यामुळे कोरेगाव भीमा येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुणे-नाशिक महामार्गावर अोढ्याचे पाणी आल्याने कोंडी झाली होती.  

कोरेगाव भीमा येथे बुधवारपासून पावसामुळे महामार्गावर डिंग्रजवाडी फाटा ते वढू चौकादरम्यान मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. तर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये अंदाज न आल्याने अनेक दुचाकीचालक पडून अपघातही झाले. यात आठवडे बाजाराची भर पडल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, रुग्ण या सर्वांचेच हाल झाले. वाहतूक सुरळीत होण्यासाठी सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच प्रकाश ढेरंगे, माजी उपसरपंच जितेंद्र गव्हाणे व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह तर सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर यांनी सहकाऱ्यांसह पुढाकार घेतला.

त्यांनी मुरूम टाकून रस्ता दुरुस्ती तसेच वाहतूक सुरळीत केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. कोरेगावात रस्त्यावर साठणारे तसेच नागरी वस्त्यांमध्येही साठणारे पावसाचे पाणी वाहून जाण्याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी माजी सरपंच विजय गव्हाणे पाटील, उद्योजक विलासराव गव्हाणे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष बबुशा ढेरंगे, माजी उपसरपंच कांतिलाल फडतरे व स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

वाकी खुर्दमध्ये महामार्गाला नदीचे स्वरूप
चाकण व परिसरात रात्रीपासून पडत असलेल्या पावसाने येथील वाकी खुर्द (ता. खेड) गावच्या हद्दीतील पुणे-नाशिक महामार्गाला गुरुवारी (ता. १९) सकाळी आठपासून नदीचे स्वरूप आले होते. 

काही लोकांनी ओढा अडविल्याने पूर्व बाजूला पाणी वाहत नव्हते. त्यामुळे महामार्गावरून अगदी चार फुटांपर्यंत पाणी वाहत होते. काही घरांतही पाणी शिरले. नाशिक बाजूकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा अगदी दोन किलोमीटरवर लागल्या होत्या. 

पुणे-नाशिक महामार्गावर वाकी खुर्द गावच्या हद्दीत जाधववस्तीजवळ ओढ्यातील पाणी महामार्गावर आले होते. त्यामुळे वाहतूक काही काळ बंद राहिली. त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरू झाली. याबाबत वाकी खुर्दचे सरपंच रामदास जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव जाधव यांनी सांगितले की, जुना ओढा काही लोकांनी भिंती टाकून अडविला आहे.

ओढ्यावर काही लोकांनी प्लॉटिंग केले आहे. दोन हजार सहापासून तहसीलदार, महसूल प्रशासनाला याबाबत ग्रामपंचायतीने अर्ज केले आहेत. पण प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. कारवाई करून ओढा खुला करणे गरजेचे आहे. याबाबत बाजीराव वहिले, शांताराम जाधव, बाळासाहेब जाधव यांनीही याबाबत प्रशासनाने तसेच रस्ते कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गावर पाणी का साचते याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगितले. 

आर्थिक तडजोडी झाल्याने ओढा बंद
वाकी खुर्दला काही लोकांनी ओढा अडविला, याबाबत काहींनी माहिती अधिकारात माहिती मागविली होती. ओढा खुला करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु काही आर्थिक तडजोडी झाल्याने ओढा खुला करण्यात आला नाही. महामार्गाच्या पूर्व बाजूला ओढ्याचे पाणी जाण्यासाठी जागा नाही. तसेच ओढ्याच्या दोन्ही बाजूंनी बांधकामे झाल्याने ओढा गाडलाच गेला आहे. त्यामुळे महामार्गावर पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

अनेकांचे नुकसान
ओढ्याचे पाणी अडल्याने शांताराम जाधव यांचा जनावरांचा गोठा, कडब्याची वळई पाण्यात गेली आहे. तसेच संदीप जाधव, विष्णू जाधव, नामदेव जाधव, मच्छिंद्र जाधव यांची घरे पाण्यात गेली आहेत. महसूल प्रशासन, रस्ते कंपनी, बांधकाम विभागाचे अधिकारी, वाहतूक विभागाचे पोलिस येथे फिरकले नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला. काही तासाने रस्ते कंपनीचे मजूर आले. त्यांनी पाणी वाहण्यासाठी दुभाजक फोडण्याचा प्रयत्न केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Road Hole Water Flood Highway Close Traffic