आंबेगाव, खेड व शिरूरवासियांनो कोरोनाबरोबर आता 'या' संकटाचा सामना करावा लागणार?

डी. के. वळसे-पाटील
रविवार, 2 ऑगस्ट 2020

आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये पाणीसाठा निम्माच आहे.

मंचर : आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस परिस्थिती चिंताजनक आहे. पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने या भागात असलेल्या कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) व घोड धरणातील पाणीसाठा निम्म्याहून कमी आहे.

गेल्या वर्षी ता १ ऑगस्टला धरणे तुडुंब भरले होती. कालवे व नद्यामधून पाणी सोडले होते. गेल्या वर्षी हुतात्मा बाबू गेनू जलाशय पाणलोट क्षेत्रात एक हजार चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी एकूण ३८६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

 “गेल्या वर्षी जून, जुलै या महिन्यात भीमाशंकर, आहुपे खोऱ्यात व खेड तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे ता. १ ऑगस्ट २०१९ रोजी कलमोडी धरण १०० टक्के, चासकमान धरण ९८.२६ टक्के, भामा आसखेड धरण ९२.९२ टक्के, डिंभे धरण ८६.०३ टक्के, घोड धरण ४० टक्के भरले होते. शनिवार (ता.१) पाऊस कमी झाल्यामुळे कलमोडी धरण ४६.४२ टक्के, चासकमान धरण १७.०९ टक्के, भामा आसखेड धरण ४२.३६ टक्के, डिंभे धरण ३६.७५ टक्के, घोड धरण ४२.७५ टक्के भरले आहे.

आंबेगाव व शिरूर तालुक्यात घोडनदीवर असलेले २५ व मीनानदीवर असलेले बारा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर पावसाचा अंदाज घेवून लोखंडी ढापे बसवावेत अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. त्यामुळे पाणीसाठा शिल्लक ठेवण्यास मदत होईल.

शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सद्यस्थिती कमी झालेल्या पावसाची परिस्थिती लक्षात घेवून पिकांचे नियोजन करावे. पाण्याचा काटकासरीने वापर करावा, असे आवाहन आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall in Ambegaon, Khed and Shirur talukas is very low