मनसेच्या संघटनात्मक बांधणीचे दोर बारामतीकरांच्या हातात

मिलिंद संगई
Friday, 24 January 2020

आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील कात टाकताना एका बारामतीकरावरच संघटनात्मक बांधणीची जबाबदारी सोपविली आहे.

बारामती : राज्यात एकीकडे शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर बारामतीचे महत्त्व राजकीय पटलावर पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील कात टाकताना एका बारामतीकरावरच संघटनात्मक बांधणीची जबाबदारी सोपविली आहे. बारामती येथील नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख अॅड. सुधीर पाटसकर यांच्यावर खुद्द राज ठाकरे यांनी नव्याने संघटना बांधण्याची जबाबदारी सोपविली असल्याचे मुंबईत काल झालेल्या मेळाव्यात जाहीर केले.

..तर हिंदू म्हणून अंगावर जाईन - राज

येत्या काळात सुधीर पाटसकर व वसंत फडके हे दोन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आपल्याला त्रास देतील अशा मिश्कील शब्दात राज ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीची जबाबदारी या दोघांवर सोपवीत असल्याचे जाहीर केले .

आपल्या झेंड्याचा रंग भगवा करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता नव्याने राजकीय कात टाकणार असल्याचे स्पष्ट केले. यात विशेष म्हणजे गेल्या काही काळात राज ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे संबंध अधिक मधुर झाले होते, या पार्श्वभूमीवर आता एका बारामतीकरावर मनसेच्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी सोपविण्यात आल्याने ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच सुधीर पाटसकर हे राज ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले आहेत. त्यांच्या निष्ठेची दखल घेत त्यांच्यावर आता संघटनात्मक बांधणीची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे . त्यामुळे मनसेच्या पटलावर देखील बारामतीतील स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray gives responsibility of Party restructure to Sudhir Pataskar