Raj Thackeray Maha Aarti from MNS against mosques loudspeaker pune
Raj Thackeray Maha Aarti from MNS against mosques loudspeaker pune sakal

पुणे : भोंग्या विरोधात मनसेकडून महाआरती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहरात आज सुमारे १७ ठिकाणी महाआरतीचे आयोजन

पुणे : मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) शहरात आज सुमारे १७ ठिकाणी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. तर कोंढव्यामध्ये कार्यकर्त्यांनी आरती करण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मनसेच्या या आरतीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा नाही तर मशिदींपुढे मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावा असे वक्तव्य त्यांच्या सभांमधून केले होते. ४ मे रोजी राज्यभरात महाआरती करा, तसेच हनुमान चालिसा लावा असे आदेश देताना, हे आंदोलन केवळ एक दिवस करणार नाही. तर यापुढेही विविध माध्यमातून भोंग्याविरोधात आंदोलन केले जाईल असे स्पष्ट केले होते.

शहरात ४ मे रोजी गडबड होऊ नये यासाठी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या होत्या. तरीही आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शहराच्या विविध भागात महाआरतीचे आयोजन केले होते. कोंढव्यात शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी आरती करण्यापूर्वीच त्यांना व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कोथरूड येथे प्रदेश सरचिणीस हेमंत संभूस यांना अलंकार पोलिसांनी महाआरतीनंतर ताब्यात घेतले. कुमठेकर रस्ता येथे खालकर चौक येथील मारुती मंदिर येथे सरचिणीस अजय शिंदे यांनी आरती आयोजित केली होती. तर सिंहगड रस्ता भागात जिल्हा सचिव सचिन पांगारे, अतुल देवकर यांच्यासह इतरांना सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

‘‘मनसेच्या कार्यकर्त्यांनी आरती करू नये, भोंगे लावून आंदोलन करू नये यासाठी राज्य सरकार व पोलिसांकडून कायम दबाव होता. मला कोंढव्यातून आरती करण्यापूर्वीच ताब्यात घेऊन हिटलरशाहीचे दर्शन सरकारने केले आहे. शहरात कोथरूड, कुमठेकर रस्ता, येरवडा यासह सुमारे१७ ठिकाणी कार्यकर्त्यांनी आरती केली. राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे यापुढेही आंदोलन सुरू राहील.’’

- साईनाथ बाबर, शहराध्यक्ष, मनसे

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com