
शंभर गाड्या, हजारो कार्यकर्ते, राज ठाकरे पुण्यातून होणार औरंगाबादकडे रवाना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. यासाठी गुरुवारी पोलिसांनी परवानगी दिली. मात्र, काही अटी व शर्तीही लादल्या आहेत. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर रविवारी हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते दाखल होणार आहेत. (Raj Thackeray Aurangabad Sabha)
राज ठाकरे यांची औरंगाबाद सभा सर्वाधिक चर्चेची ठरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या सभेआधी उत्तर प्रदेशात मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई झाली आहे. तर राज्यातील अन्य पक्षांचे नेते सध्या हनुमान चालिसा पठणाचे विषय चघळत आहेत. त्यामुळे ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदींवरील भोंग्यांच्या मागणीचे पडसाद उमटत असल्याचं स्पष्ट झालंय.
औरंगाबादच्या सभेला जाण्यापूर्वी राज ठाकरे आज सायंकाळी चार वाजता पुण्यात येणार आहे. यानंतर ३० एप्रिलला सकाळी ते औरंगाबादकडे रवाना होतील. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ताफ्यात शंभराहून अधिक चारचाकी गाड्या असतील. ठाकरे यांच्या सभेआधी मनसेचे कार्यकर्ते मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. पुण्यातून हजारो कार्यकर्ते राज ठाकरेंसोबत औरंगाबादला जाणार आहेत.
पुण्यात केली होती सभेची घोषणा
मधल्या काळात पुण्यात राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला रमजानचा महिना संपेपर्यंत 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच याच पत्रकार परिषदेत आपण1 मे रोजी औरंगाबादमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेणार असल्याचं जाहीर केलं होतं.
मनसेची सर्व तयारी पूर्ण, प्रचारगीतही लॉन्च
मनसेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी तयारी पूर्ण केली असून यासाठी खास प्रचारगीतही लॉन्च केलं आहे. पण अद्याप सभेला पोलिसांनी परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, संध्याकाळपर्यंत पोलिसांकडून अटी-शर्थींसह परवानगी दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.