shubham kale
shubham kalesakal

Crime News : दोन वर्षांपूर्वीच्या यात्रेतील भांडणाच्या वादातून युवकाचा निर्घृण खून

खुन्नस देण्याच्या कारणावरून, खेड तालुक्यातील चांदूस येथे एका युवकावर ६ युवकांनी, धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली.
Summary

खुन्नस देण्याच्या कारणावरून, खेड तालुक्यातील चांदूस येथे एका युवकावर ६ युवकांनी, धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली.

राजगुरूनगर - दोन वर्षांपूर्वी यात्रेत झालेल्या भांडणानंतर, एकमेकांना खुन्नस देण्याच्या कारणावरून, खेड तालुक्यातील चांदूस येथे एका युवकावर ६ युवकांनी, धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. शुभम निवृत्ती काळे (वय २०, रा. काळेबडे वस्ती, चांदूस, ता. खेड) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.

या गुन्हयात संदीप अशोक कल्हाटकर, यशराज विजय वाघमारे, सूरज गोगावले (सर्व रा. कोरेगाव, ता. खेड), वैभव कोळेकर (रा. कडाची वस्ती, किवळे, ता. खेड), शुभम उर्फ सोन्या चंद्रकांत कारले व एक अल्पवयीन (रा.विठ्ठलवाडी, चांदूस ता. खेड ) हे सहा संशयित आरोपी असून पोलिसांनी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोघांना अटक केली आहे.

पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मृत युवकाचे चुलते बाळासाहेब दगडू काळे यांनी फिर्याद दिली आहे. कोरेगाव रस्त्यावरील चांदूसच्या वाळुंजवस्ती येथे निसर्गसृष्टी प्लॉटींग आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास शुभम काळे हा युवक त्याठिकाणी होता. त्याची आणि या सहा संशयित आरोपींची दोन वर्षांपूर्वी गावच्या यात्रेत भांडणे झाली होती. तेव्हापासून ते एकमेकांकडे खुन्नसने पाहत होते.

आठवड्यापूर्वी त्यांच्यात बाचाबाची झाली होती. तेव्हा गावकऱ्यांनी मध्यस्थीने भांडण मिटविले होते. मात्र त्यानंतरही त्यांच्यात खुन्नस राहिली. त्यामुळे वाळुंजवस्तीवर शुभम सापडल्यावर सहाही संशयित आरोपींनी त्याच्या चेहर्‍यावर व हातावर, धारदार हत्याराने सपासप वार केले. त्यानंतर ते तेथून पळून गेले. जखमी शुभमला राजगुरूनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र औषधोपचार चालू असतानाच रात्री आठ वाजता तो मरण पावला.

खेड पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दोन संशयित आरोपींना अटक केली असून इतर चार जण फरार आहेत. पोलिस निरीक्षक केंद्रे अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com