
पुणे : ''महाराष्ट्रातील जनतेला, शेतकऱ्यांना सन्मानाने वागवायचे असेल तर आपल्याला एकत्र आले पाहिजे, अन्यथा आपल्यावर झडप घालण्यासाठी पेशवाईची गिधाडे घिरट्या घालत आहेत,'' अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी भाजप-शिवसेनेवर टीका केली.
पेशवाईची गिधाडे झडप घालण्याच्या तयारीत : राजू शेट्टी
पुणे : ''महाराष्ट्रातील जनतेला, शेतकऱ्यांना सन्मानाने वागवायचे असेल तर आपल्याला एकत्र आले पाहिजे, अन्यथा आपल्यावर झडप घालण्यासाठी पेशवाईची गिधाडे घिरट्या घालत आहेत,'' अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी भाजप-शिवसेनेवर टीका केली.
बहुजन मुक्ती पार्टीचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित केला होता. त्यावेळी राजू शेट्टी बोलत होते. बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम, बहुजन मुक्ती पार्टीचे अध्यक्ष व्ही. एल. मातंग, राष्ट्रीय महासचिव राहूल मखरे, अॅड. बी.जी. बनसोडे, उपाध्यक्ष प्रताप पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनिता पाटील उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, ''आपण एकाच दिशेने जाणारे प्रवासी आहोत, सर्वांनी एकमेकांशी मदत केली पाहिजे अन्यथा पेशवाईची गिधाडे झडप घालण्यासाठी फिरत आहेत. 'इगो' बाजूला ठेवा महाराष्ट्रातील जनतेला, शेतकऱ्याला सन्मानने जगायचे असले तर या गिधाडां विरोधात लढले पाहिजे. माणसा माणसात, धर्मा धर्मात, जातींमध्ये भांडणे लावून देणारे लोक महाराष्ट्रात आले आहेत. यांच्या पेक्षा इंग्रज परवडले. ही विचाराची लढाई असल्याने एकत्र आले पाहिजे.'' ''राज्यातील प्रस्थापित राजकारणी मंडळींना या परिस्थितीचे काही देणे घेणे नाही. ते सत्तेचा लाभ घेण्यासाठी भाजप शिवसेनेत जात आहेत. त्यामुळे हे बुडणारे जहाज वाचविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. केंद्राच्या व राज्याच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना या दलाल व मुठभर लोकांना फायदा मिळवून देणाऱ्या आहेत. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्र उध्वस्त होत आहे. पंतप्रधान फसल योजना ही प्रधानमंत्री कार्पोरेट कल्याण योजना आहे. शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था पहाता या वीमा कंपन्या कंगाल झाल्या पाहिजे होत्या. पण त्यांना हजारो कोटीचा फायदा झाला पाहिजे,'' अशी टीका शेट्टी यांनी केली.
मेश्राम म्हणाले, ब्राह्मणी व्यवस्थेने आपल्याला भिन्न जातींमध्ये विभागले आहे. आता इव्हीएम मशीनमधून आपल्या मतदानाची चोरी केली जात आहे. संविधान आणि लोकशाही संपविण्यासाठी इव्हीएमचा वापर होत आहे. त्यामुळे इव्हीएमला नष्ट करणे गरजेचे आहे. मतपत्रिकेची मागणी करताना इव्हीएमचे सत्य सांगितले पाहिजे. इव्हीएम असेल तर, पारदर्शक निवडणूक होऊ शकत नाही. ती मागास टेक्नोलॉजी आहे. याविरोधात आंदोलन, जनजागृती करण्याची गरज आहे. भाजप सरकार संसदेत बहुमतात आहेत, पण लोकांमध्ये अल्पमतात आहेत. त्यांनी लोकांच्या मतांवर दरोडा घातला आहे. मॉब लिचिंग प्रकरणे घडवून आणून देशातील सदस्यांवरील लोकांचे लक्ष हटवले जात आहे.
Web Title: Raju Shetty Criticizes Bjp And Shiv Sena
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..