...तर 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते कायदा हातात घेतील : राजू शेट्टी (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 October 2019

- परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला

- शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले 

- शेतात झालेल्या नुकसानीचे प्रशासनाच्या वतीने पंचनामेही करण्यात आले नाहीत.

पुणे : परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात झालेल्या नुकसानीचे प्रशासनाच्या वतीने पंचनामेही करण्यात आले नाहीत. त्यांना मदत मिळणे तर लांबची गोष्ट. त्यामुळे येत्या 5 नोव्हेंबरपर्यंत जर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाली नाही तर शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून कायदा हातात घेईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी प्रशासनाला दिला आहे.

राजू शेट्टी म्हणाले, परतीच्या पावसामुळे शेतकरी उद्धवस्त झाला आहे. या पावसामुळे भात, कांदा, कापूस, मका, सोयाबीन, भुईमूग, द्राक्षे, फळबाग यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. डोळ्यासमोर शेतकऱ्यांचे पिकं नष्ट झाली आहेत. मात्र, कुणालाही शेतकऱ्यांची चौकशी करण्यासही वेळ नाही. विमा कंपन्यांनी पंचनामा केल्याशिवाय शेतकऱ्यांना दुसऱ्या पिकाची नियोजन करता येत नाही. त्याच्याकडे लक्ष देण्यास कुणीही तयार नाही. प्रशासनानेही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे डोळेझाक केली.

एकाही कृषी अधिकाऱ्याला, जिल्हाधिकाऱ्याला शेतमालाचा पंचनामा करावासा वाटत नाही. पीकविमा कंपन्यांनाही शेतकऱ्यांकडून विम्याचे हप्ते घेतले. मात्र, त्यांनाही पिकांचा पंचनामा करावा वाटत नाही. जर राज्यकर्त्यांनी, विमा कंपन्यांनी आणि प्रशासनाने 5 नोव्हेंबरच्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे केले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून कायदा हातात घेतील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetty Warns Administration on Farmers Issue