राजू शेट्टींचा निर्णय झाला...राष्ट्रवादीच्या कोट्यातून होणार आमदार 

मिलिंद संगई
Tuesday, 16 June 2020

माजी खासदार राजू शेट्टी हे राष्ट्रवादी कांग्रेसच्या कोट्यातून राज्यपालनियुक्त आमदार होणार, हे आज निश्चित झाले. 

बारामती (पुणे) : माजी खासदार राजू शेट्टी हे राष्ट्रवादी कांग्रेसच्या कोट्यातून राज्यपालनियुक्त आमदार होणार, हे आज निश्चित झाले. 

आज बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार व राजू शेट्टी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार शेट्टी यांनी राष्ट्रवादीचा आमदारकीचा प्रस्ताव मान्य केला आहे. शेतकरी संघटनेचे बारामतीचे ज्येष्ठ नेते सतीश काकडे यांनीही याला दुजोरा दिला आहे. या मध्ये सतीश काकडे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. 

वाहनचालकांनो, तुमच्यासाठी आहे ही महत्त्वाची बातमी

आज बारामतीतील गोविंदबाग या पवार यांच्या निवासस्थानी राजू शेट्टी, सतीश काकडे, राजेंद्र ढवाण आदींची बैठक झाली. या बैठकीदरम्यान राजू शेट्टी यांनी आमदारकीचा प्रस्ताव मान्य केल्याचे काकडे यांनी सांगितले. खासदार सुप्रिया सुळे याही बैठकीस उपस्थित होत्या.

पेट्रोलच्या दरवाढीचा दस का दम
 
दरम्यान, आज खुद्द पवार यांनी बारामती पंचक्रोशीतील विविध शेतीचे प्रयोग, कृषी विज्ञान केंद्र, सेंटर ऑफ एक्स्लेन्स याची माहिती शेट्टी यांना दिली. जवळपास अडीच तासांहून अधिक काळ पवार यांनी स्वतःच्या गाडीतून शेट्टी यांना फिरवत या परिसरात सुरु असलेल्या नवीन शेतीच्या प्रयोगांबाबत स्वतः माहिती दिली. 

शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकत्रितरित्या राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारकी देण्याचे निश्चित केले आहे. राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव मान्य केला. त्याळे आता पवार व शेट्टी यांचे मैत्रीपर्व नव्याने सुरु होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सतीश काकडे यांना वाढदिवसाचे खास भोजन
सतीश काकडे यांचा आज वाढदिवस असल्याने शरद पवार यांनी त्यांना खास भोजनासाठी थांबवून घेतले. आजच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात वेगळी समीकरणे उदयास येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याची राजू शेट्टी यांची तक्रार होती. शपथविधीलाही त्यांना आमंत्रण दिलेले नव्हते, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काहीसे उत्साहाचे वातावरण आहे. राजू शेट्टी यांना ताकद देऊन राष्ट्रवादीने बाजी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetty will become MLA from NCP quota