फिटे अंधाराचे जाळे.. 

रमेश डोईफोडे 
Sunday, 17 January 2021

पहिली लस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी घ्यायचा आणि त्यानंतर दोन आठवड्यांनी- म्हणजे एकूण ४२ दिवसांनी संबंधित व्यक्ती ‘कोरोना’ला तोंड देण्यास सक्षम होईल, अशी अपेक्षा आहे.

‘कोरोना’च्या संकटात तारणहार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात आहे, त्या जीवरक्षक दोन लशी देशात अखेर उपलब्ध झाल्या आहेत. रुग्णांवर उपचार करताना मोठी जोखीम घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात ही लस दिली जात आहे. उर्वरितांना ठरलेल्या प्राधान्यक्रमानुसार नंतर त्या मिळणार आहेत. 

अनिश्‍चितता दूर 
ब्रिटनसारख्या देशांत ‘कोरोना’चा कहर अजून सुरू असला, तरी आपल्या देशात, राज्यात आणि पुणे शहरासह जिल्ह्यातही परिस्थिती यापूर्वीच नियंत्रणात आली आहे. पाच-सहा महिन्यांपूर्वी या आजाराची दहशत एवढी होती, की अनेक जण घराबाहेर पडायला धजावत नव्हते. नोकरी, व्यवसाय, पैसा यांपेक्षा सुरक्षित राहणे महत्त्वाचे ठरले होते. ‘जान है तो जहान है’ अशी तेव्हाची सर्वव्यापी मानसिकता होती. त्यामुळे या महाभयानक विषाणूचा पाडाव करेल, असे औषध वा लस लवकरात लवकर मिळावी, यासाठी सर्व जण व्याकूळ झाले होते. आता प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात झाल्यामुळे त्याबाबतची अनिश्‍चितता दूर झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यस्तरीय लसीकरणाचे उद्‌घाटन करताना ‘क्रांतिकारी दिवस’ असे पहिल्या दिवसाचे वर्णन केले आहे. 

निम्मेच डोस मंजूर 
‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीचे नऊ लाख, ६३ हजार डोस; तर ‘भारत बायोटेक’ कंपनीचे वीस हजार डोस महाराष्ट्रासाठी उपलब्ध झाले आहेत. राज्यातील आरोग्य क्षेत्रातून लशीसाठी नोंदविण्यात आलेल्या मागणीपेक्षा हे डोस जवळपास निम्म्याने कमी आहेत. त्यातही वाहतुकीदरम्यान वा अन्य कारणांनी होणारी तूट-फूट, हानी गृहीत धरून दहा टक्के डोस राखीव ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे राज्यात लसीकरण कार्यक्रमाचे फेरनियोजन करावे लागले आहे. 

पहिली लस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी घ्यायचा आणि त्यानंतर दोन आठवड्यांनी- म्हणजे एकूण ४२ दिवसांनी संबंधित व्यक्ती ‘कोरोना’ला तोंड देण्यास सक्षम होईल, अशी अपेक्षा आहे. थोडक्‍यात, लशीचे परिणाम दृष्टिपथात येण्यासाठी सुमारे दीड महिना लागणार आहे. 

CET सेलकडून विद्यार्थ्यांना दिलासा; जात, इडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यासाठी मुदतवाढ

दक्षता आवश्‍यकच 
‘सिरम’च्या लशीला खुल्या बाजारात विक्रीची परवानगी मिळाल्यावर ती एक हजार रुपयांना मिळू शकणार आहे. ज्यांना सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून लस घेता आलेली नाही किंवा प्राधान्यक्रमानुसार आणखी वाट पाहण्याची तयारी नाही, त्यांना हा सशुल्क पर्याय खुला असेल. ती कधीपर्यंत मिळेल, याविषयी स्पष्टता नाही. ही सर्व परिस्थिती पाहता, सर्वसामान्यांना लस सहजगत्या उपलब्ध होण्यास आणखी काही महिने लागतील. 

सध्या लस घ्यायची किंवा नाही, याचा निर्णय लाभार्थी घेऊ शकतात. मात्र कोणत्या कंपनीची लस घ्यायची, हे निवडण्याची मुभा कोणालाही नाही. लसीकरण कार्यक्रमात वेगवेगळ्या ठिकाणी जी लस वाट्याला आली असेल, तीच घ्यावी लागणार आहे. भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्‍सिन’ चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. ही लस घेताना संबंधितांना संमतीपत्र द्यावे लागणार आहे. ‘सिरम’च्या ‘कोव्हिशिल्ड’ने सर्व चाचण्या समाधानकारकरीत्या पूर्ण केल्या आहेत. ही लस घेणाऱ्यांनी लेखी संमती देण्याची गरज नाही. 

हे वाचा - CET सेलकडून विद्यार्थ्यांना दिलासा; जात, इडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यासाठी मुदतवाढ

अल्पावधीत लसनिर्मिती 
जगभरात वेगवेगळ्या कंपन्यांच्या सहा लशी उपलब्ध आहेत. त्यांत वरील दोहोंचा समावेश आहे. ‘‘आपली लस शंभर टक्के परिणामकारक आहे,’’ असा दावा यांपैकी कोणत्याही उत्पादक कंपनीने केलेला नाही. त्यामुळे, एकदा लस घेतली की ‘कोरोना’ला कायमस्वरूपी हरविणारी कवचकुंडले आपल्याला प्राप्त होतील आणि आपण निर्बंध झुगारून पूर्वीप्रमाणे वावरू शकतो, अशी समजूत करून घेणे जोखमीचे ठरू शकते. एखाद्या लशीचे चाचणी पातळीवरील निष्कर्ष समाधानकारक असले, तरी तिची परिणामकारकता प्रत्यक्ष व्यापक लसीकरणानंतरच खऱ्या अर्थी स्पष्ट होते. कोणत्याही आजारावरील नवीन लस वापरात येते, तेव्हा त्यामागे दीर्घ काळचे- अनेकदा अनेक वर्षांचे संशोधन असते. ‘कोरोना’वरील लशी मात्र तुलनेने खूप कमी काळात तयार झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभाव कसा असेल, किती काळासाठी राहील, यांविषयी सर्वांना उत्सुकता आहे. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मोठा दिलासा 
देशाची लोकसंख्या सुमारे १३८ कोटी आहे. त्यांत लस घेण्यासाठी पात्र असलेल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत ती पोचण्यासाठी काही महिने लागू शकतात. त्यामुळे ‘कोरोना’मुक्तीची यापुढील वाटचालही तशी दीर्घ असेल. मग तातडीचा परिणाम म्हणून या लशीमुळे नेमके साधले काय?... या प्रश्‍नाचे एक उत्तर म्हणजे, लोकांची मानसिकता बदलण्यास तिचा मोठा उपयोग होणार आहे. या महाभयानक विषाणूने केवळ पुण्यात सुमारे ४७०० लोकांचे प्राण घेतले. या आजाराचा धसका सुरुवातीला एवढा होता, की आपल्या ‘कोरोना’ चाचणीचा निकाल जाणून घेण्याआधीच काहींनी भयापोटी आत्महत्या केल्या. अनेक जण मानसिकदृष्ट्या अस्थिर झाले. हे प्रकार देशभरात सगळीकडे घडले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

हा भयगंड कमी करण्यास वा घालविण्यास लशीमुळे तयार झालेले सकारात्मक वातावरण उपयुक्त ठरणार आहे. ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश’ या काव्यपंक्तीप्रमाणे निराशेचे मळभ हटणार आहे. या आजारावरील उपचाराचा ‘असाध्य ते साध्य’ हा प्रवास निराशेच्या सावटाखालील लोकांना उभारी देणारा आहे. सरसकट सर्वांना लस मिळायची तेव्हा मिळो; पण हा दिलासाही तूर्त मोठा आधार आहे! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramesh doiphode article about Corona first vaccine pune