संकटमुक्तीच्या मार्गावर...

पुण्यात ‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेत नवीन बाधित रुग्णांची संख्या अतिशय चिंताजनक पातळीवर पोचली होती.
Coronavirus
CoronavirusSakal

पुण्यात ‘कोरोना’च्या (Corona) दुसऱ्या लाटेत (Second Wave) नवीन बाधित रुग्णांची (Patient) संख्या अतिशय चिंताजनक पातळीवर पोचली होती. कित्येक दिवस रोज सात ते आठ हजार नवीन रुग्णांची नोंद होत होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे या महिन्यात ही संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. सध्या एक हजारांच्या आसपास हा आकडा स्थिरावला आहे. (Ramesh Doiphode Writes about Coronavirus Patients Decrease)

पुण्यातील स्थितीत सुधारणा

प्रशासनाकडून दिली जाणारी रुग्णांची आकडेवारी वस्तुनिष्ठ आहे किंवा कसे, याविषयी अनेकदा शंका घेतली जाते. हा केवळ पुण्याचा विषय नाही, तर अन्य शहरांत, तसेच महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात आदी राज्यांच्या अनुषंगानेही विरोधकांकडून प्रश्‍न उपस्थित केला जातो. सरकारी आकडेवारीत कोठे गफलत होत असेल, असे गृहीत धरले तरी त्या-त्या ठिकाणच्या रुग्णालयांतील चित्र पुरेसे बोलके असते. त्या निकषावर पुण्यातील परिस्थिती खचितच सुधारली आहे, यात शंका नाही.

Coronavirus
पुण्यात पुन्हा तीन आकडी रुग्णसंख्या; रविवारी लसीकरण सुरु

प्राणवायूचा पुरवठा सुरळीत

कोणत्याही रुग्णालयात तीनेक आठवड्यांपूर्वी बाधितांना सहजासहजी खाटा उपलब्ध होत नव्हत्या.. वैद्यकीय प्राणवायू आणि ‘रेमडेसिव्हिर’ इंजेक्शनची टंचाई होती.. ‘रेमडेसिव्हिर’ मिळविण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांना अक्षरशः वणवण करावी लागत होती. हजार-बाराशे रुपयांचे इंजेक्शन काळ्या बाजारात ५० हजारांना विकले जात होते.. आता हे चित्र बदलले आहे. अनेक ठिकाणी ‘आयसीयू’, व्हेंटिलेटरच्या सुविधेसह खाटा मिळत असून प्राणवायू आणि ‘रेमडेसिव्हिर’चा पुरवठा सुरळीत झाला आहे.

‘रेमडेसिव्हिर’च्या वापराला विरोध

विशेष बाब म्हणजे, गेल्या काही दिवसांत औषधांच्या मागणीचा प्रवास उलट दिशेने सुरू झाला आहे ! ‘रेमडेसिव्हिर’च्या अयोग्य वापरामुळे बुरशीचा आजार (म्युकरमायकोसिस) होण्याची शक्यता असते, असे स्पष्ट झाल्यावर रुग्णांचे नातेवाईक ‘हे औषध आमच्या रुग्णाला देऊ नका’ अशी विनंती डॉक्टरांना करू लागले आहेत. दरम्यान, पुण्यातील काही मोठ्या रुग्णालयांनी ‘रेमडेसिव्हिर’चा वापर पूर्णतः थांबविला आहे. त्याची कल्पना रुग्णाला त्यांच्याकडे दाखल करून घेतानाच दिली जात आहे. हा केवढा मोठा बदल आहे? जे औषध जीवनदायी समजले जात होते, ते आता ‘नकोच’ असे निग्रहाने सांगितले जात आहे. ही जागरूकता यापूर्वीच निर्माण झाली असती, तर यासंदर्भात जे कटू अनुभव संबंधितांना आजवर आले, ते टाळता आले असते.

बुरशीप्रतिबंधक औषधांची टंचाई

‘रेमडेसिव्हिर’बाबत जे घडले, तोच प्रकार कमी-अधिक प्रमाणात अलीकडे ‘स्टेरॉइड’विषयी सुरू आहे. ‘स्टेरॉइड’च्या अतिवापरामुळे ‘म्युकरमायकोसिस’ होण्याचा धोका वाढत आहे, याकडे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी लक्ष वेधले आहे. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण पुणे जिल्ह्यातही असे काही प्रकार निदर्शनास आले आहेत. गरज नसताना किंवा अतिप्रमाणात ‘स्टेरॉईड’ दिल्यामुळे रुग्णाची स्थिती गंभीर झाली आणि नंतर त्याला मोठ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला, अशी उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत पुढचे सारे शारीरिक, मानसिक, आर्थिक भोग रुग्णाच्या आणि त्याच्या आप्तांच्या वाट्याला येत आहेत. ‘म्युकरमायकोसिस’ हा आजार तसा दुर्मिळ. त्यामुळे त्याच्यावरील औषधांची उपलब्धताही मर्यादित. पूर्वी ‘रेमडेसिव्हिर’साठी जी धावपळ व्हायची, ती आता या औषधांसाठी होऊ लागली आहे. तूर्तास हाच सगळ्यांत गंभीर प्रश्‍न बनला आहे.

Coronavirus
'खासगी'सहित पुणे महापालिकेच्या ७० केंद्रांवर रविवारी लसीकरण

खासगी रुग्णालयांना लस उपलब्ध

लशींची परिणामकारकता एव्हाना जागतिक पातळीवर सिद्ध झाली आहे. त्यामुळे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी पात्र व्यक्तींनी लवकरात लवकर लस घेणे, याला कोणताही पर्याय नाही. सध्या लशींची टंचाई असली, तरी नजीकच्या काळात पुरवठा वाढेल, अशी सुचिन्हे आहेत. रशियातील ‘स्पुटनिक व्ही’ लशीचे देशात आगमन झाले आहे. प्रथम हैदराबादमध्ये ही लस वापरात येत आहे.

‘कोव्हॅक्सिन’चे उत्पादन करण्यास ‘भारत बायोटेक’खेरीज इतरही काही कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. मुंबई, रायगड, ठाणे आदी जिल्ह्यांतील १५ खासगी रुग्णालयांनी थेट उत्पादकांकडून लस मिळवून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरू केले आहे. पुण्यातीलही काही रुग्णालयांना लस मिळाली असून, त्यांनी शनिवारपासून लस देण्यास प्रारंभ केला आहे. राज्य सरकार आणि महापालिका जागतिक पातळीवर निविदा काढून लशींची खरेदी करण्याचे नियोजन करीत आहे. या सगळ्या प्रयत्नांमुळे लशीचे दुर्भिक्ष निवळण्यास निश्‍चितच मदत होणार आहे.

औषधांबरोबर दक्षताही महत्त्वाची

थोडक्यात, सगळे प्रश्‍न तातडीने सुटणार नसले, तरी ते मार्गी लागण्याच्या दिशेने घडामोडी होत आहेत. महापालिका, राज्य आणि केंद्र सरकार त्यांच्या स्तरावर प्रयत्न करीत आहेत. त्यांना सहकार्य करण्यासाठी आपण केवळ शिस्त पाळण्याचे कर्तव्य पार पाडले, तरी पुरेसे आहे. कारण ‘कोरोना’प्रतिबंधक परिणामकारक औषधे आली, तरी ‘मास्क, वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षित अंतर’ ही त्रिसूत्री यापुढेही काही काळ अत्यावश्‍यक असणार आहे! तीत हयगय होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. अन्यथा, लस घेऊनही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com