‘कोरोना’ भयानकच; पण नंतरही..!

‘कोरोना’ची दुसरी लाट राज्यातील अनेक भागांत, विशेषतः पुण्यात ओसरायला सुरुवात झाली आहे, असे सांगितले जात आहे.
Coronavirus
CoronavirusSakal

‘कोरोना’ची (Coronavirus) दुसरी लाट (Second Wave) राज्यातील अनेक भागांत, विशेषतः पुण्यात ओसरायला सुरुवात झाली आहे, असे सांगितले जात आहे. अशी दिलासादायक माहिती मिळायला लागल्यावर दोन गोष्टी घडतात. पहिली बाब म्हणजे, समाजात सकारात्मक वातावरण निर्माण व्हायला मदत होते. आपण या महाभयंकर अरिष्टातून नक्की बाहेर पडू, असा विश्‍वास दृढ व्हायला लागतो. चिंता, नैराश्‍य यांचे सावट दूर व्हायला लागते आणि लोक आता अंगवळणी पडलेल्या नियमनांच्या चौकटीत नव्या उमेदीने वाटचाल करण्यास सज्ज होतात. दुसऱ्या बाजूला, काही लोक एवढे निर्धास्त होतात, की ‘सारे नियम तोड दो’च्या मानसिकतेत जातात. ही मंडळी आपल्या बेशिस्त वर्तनातून स्वतःला आणि त्यांच्या संपर्कातील इतरांनाही धोक्याच्या खाईत लोटतात. (Ramesh Doiphode Writes about Coronavirus Terrible)

‘कोरोना’नंतरचे संकट

‘कोरोना’च्या विषाणूने किती दुर्मीळ आजारांना वाट करून दिली आहे, याची नेमकी कल्पना वा गांभीर्य अनेकांना नाही. या अनुषंगाने जगभरात आणि आपल्या आजूबाजूला काय चालले आहे, हे नीट समजावून घेतले तर बेशिस्त वर्तनाची किती भयंकर ‘शिक्षा’ भोगावी लागू शकते, याची जाणीव संबंधितांना होईल.

आतापर्यंत लाखो कोरोनाबाधित योग्य उपचार मिळून बरे झाले आहेत. मात्र, याचा अर्थ ते सगळेच संकटातून पूर्णपणे बाहेर पडले आहेत, असा निष्कर्ष सरसकट काढण्याजोगी परिस्थिती सध्या राहिलेली नाही. त्यामुळे ‘कोरोना’वर मात करण्यापेक्षा तो आपल्या निकटच येणार नाही, याची खबरदारी घेणे अधिक श्रेयस्कर आहे. कारण, एखाद्या रुग्णाने विषाणूच्या विरोधात विजय मिळविला, तरी त्याची ही लढाई तिथेच संपेल, याची खात्री नाही. हा विषाणू रुग्णाच्या शरीरात निष्प्रभ होण्यापूर्वी, कित्येकांची रोगप्रतिकारशक्ती जणू संपुष्टात आणत आहे. त्यातून नवे आजार शरीर काबीज करीत आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘म्युकरमायकोसिस’. अनेकांना ‘कोरोना’वरील उपचारादरम्यान किंवा नंतर या बुरशीजन्य आजाराची लागण होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Coronavirus
पुणे पोलिसांनी पूर्ण केली डॉक्टर दाम्पत्याची 'ती' इच्छा...

खर्चिक उपचार

‘म्युकरमायकोसिस’चा संसर्ग नाक, दात, जबडा यामार्गे थेट मेंदूपर्यंत वेगाने पोचतो. तो हटविण्यासाठी गंभीर रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागते. ती एकच असेल असेही नाही. या प्रक्रियेत एकापेक्षा अधिक शस्त्रक्रियांना वेगवेगळ्या दिवशी सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. डोळ्यापर्यंत संसर्ग गेल्याने तो काढूनच टाकावा लागला, अशी अनेक उदाहरणे राज्यात घडली आहेत. हे किती भयंकर आहे?

या आजारावरील उपचार ‘कोरोना’वरील इलाजापेक्षाही खर्चीक ठरत आहेत. त्यात टाळेबंदीमुळे आर्थिक खच्चीकरण झालेल्या सर्वसामान्यांचा निभाव लागणे अशक्य आहे. अनेक रुग्णांना रोज दहा हजारांपासून पन्नास-साठ हजार रुपयांपर्यंत निव्वळ औषधांवर खर्च करावा लागत आहे. त्याहून गंभीर बाब म्हणजे वाटेल तेवढे पैसे खर्च करण्याची ऐपत आणि तयारी असली, तरी ठरावीक औषधे जंग जंग पछाडूनही उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पुण्यातील काही मोठी रुग्णालयेही अशा रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत आहेत. मग त्यांनी जायचे कोठे?... त्यांचे शेवटी काय होत असेल?

Coronavirus
गावातील पहिल्या जम्बो कोविड सेंटरला 24 कोटी 24 लाखाचा निधी

हे लोक कधी सुधारणार?

‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार नवीन नसला, तरी यापूर्वी तो अपवादाने आढळायचा. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातीलही कित्येक डॉक्टर त्याबद्दल अनभिज्ञ आहेत. रोगनिदानात वेळ गेल्यास रुग्णाची परिस्थिती अल्पावधीत गंभीर होत आहे. यातून सर्वसामान्यांनी धडा घेण्याची गरज आहे. भाजीपाल्यासाठी मंडईत गर्दी करणारे, रस्त्यावर अकारण हिंडणारे, मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करणारे, विशिष्ट धार्मिक समजुतींमुळे लस घेण्याची टाळाटाळ करणारे... ‘कोरोना’ला आमंत्रण देणाऱ्या या सगळ्यांनी हे नीट लक्षात घ्यायला हवे.

पुण्यात १८ कोटींचा दंड

पुण्यात नवीन रुग्णांची संख्या कमी व्हायला लागली, म्हणून काही जण त्याचे श्रेय नागरिकांनी केलेल्या सहकार्याला देत आहेत. तथापि, प्रत्यक्षात किती जण हे श्रेय घेण्यास पात्र आहेत, हे तपासून पाहिले पाहिजे. मास्कचा वापर न केल्याबद्दल गेल्या वर्षभरात शहरामध्ये सुमारे साडेतीन लाख लोकांकडून १८ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे ! असे ‘सहकार्य’ करणारे महाभाग ‘कोरोना’ला रोखण्यास कसला हातभार लावणार? थोडक्यात, शहरातील स्थिती सुधारण्यास अजून खूप वाव आहे.

शिस्तीत आहे सर्वांचे हित

लस हा ‘कोरोना’वरचा सर्वांत प्रभावी उपाय आहे. मात्र तूर्त लशीची टंचाई आहे. रुग्णालयांत खाट मिळण्याची खात्री नाही. औषधोपचार प्रचंड महाग आहेत. ‘कोरोना’शी लढताना नंतर ‘म्युकरमायकोसिस’ किंवा हृदयविकारासारखा गंभीर आजार उद्‍भवल्यास शारीरिक आणि आर्थिक हानी किती होईल, याचा अंदाजही कोणी देऊ शकत नाही... ही सगळी पार्श्‍वभूमी लक्षात घेतली, तर नियमभंगाचा वेडाचार करण्यात कोणाचेही हित नाही. शिस्तीने वागण्यात स्वतःचे, कुटुंबीयांचे आणि एकंदर समाजाचे भले आहे. अन्यथा, निसर्गाकडून चुकीला माफी नाही !...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com