बेफिकिरीचा संसर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona
बेफिकिरीचा संसर्ग

बेफिकिरीचा संसर्ग

कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे... ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव सुरुवातीला वाटला तेवढा गंभीर स्वरूपाचा नाही... आता निर्धास्तपणे वावरण्यास हरकत नाही... कोरोनाबद्दलचा सर्वसाधारण सार्वजनिक समज असा आहे. त्याचे प्रत्यंतर बाहेर सगळीकडे येत आहे. कारण बहुतांश लोकांनी आरोग्याच्या सुरक्षिततेसंबंधीचे सगळे नियम खुंटीला टांगून मुक्त संचार करायला सुरुवात केली आहे; पण त्यांना वाटते तसे पुणे शहर खरेच संकटमुक्त झाले आहे काय?...

ओमिक्रॉनचे सावट येण्यापूर्वी पुण्यातील कोरोनाची लाट जवळपास आटोक्यात आली होती. नवीन बांधितांचा दैनंदिन आकडा शंभरच्या आत आला होता; तर मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या शून्य किंवा दोन-तीनच्या आसपास असायची. त्यामुळे आपण या भीषण आजाराच्या झाकोळातून जवळपास पूर्णपणे बाहेर पडलो आहोत, असा विश्‍वास लोकांत निर्माण झाला होता. तथापि, नंतर ही परिस्थिती बदलली.

कोरोनामुक्तीचा आभास

‘कालच्यापेक्षा आजचा दिवस बरा’ असे वाटण्याजोगी आकडेवारी अलीकडे दिसत असली, तरी परिस्थिती ‘बरी’ म्हणजे नेमकी कशी आहे, याचा नीट विचार केला पाहिजे. रोज नव्याने निदर्शनास येणाऱ्या कोरोनारुग्णांची संख्या आजही एक हजारच्या जवळ आहे आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची जिल्हाभरातील संख्या दहा ते पंधरा आहे. तरीही कोरोनामुक्तसदृश वातावरण निर्माण होण्याचे कारण काय असेल?

पहिली लाट घातक

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जणू कोलमडून पडली होती. सरकारी आणि खासगी रुग्णालयांत नवीन रुग्णांना खाटा मिळत नव्हत्या. त्यासाठी थोरा-मोठ्यांचे वशिले लावावे लागत होते. रेमडेसिव्हिर इंजेक्शन कोरोनासाठी उपयुक्त असल्याचा कोणताही पुरावा नसताना त्याची मागणी प्रचंड वाढली होती. एरवी दोन-चार हजारांना मिळणारे हे इंजेक्शन काळ्या बाजारात सत्तर ते ऐंशी हजार रुपयांपर्यंत विकले जात होते. एवढे पैसे मोजूनही ते सहजपणे उपलब्ध होत नव्हते. कोरोनाच्या पुढील टप्प्यात ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराने रुग्णांची स्थिती आणखी वाईट केली. हा ‘इतिहास’ फार जुना नाही. आता तेवढी भीषण परिस्थिती राहिलेली नाही, ही निसर्गाची कृपा.

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या नगरेसवकांमध्ये पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवरून नाराजी

परिस्थितीत सुधारणा

दरम्यानच्या काळात कोरोनाप्रतिबंधक लशी आल्या, आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम झाली, या आजाराला तोंड कसे द्यायचे, याचा अनुभव डॉक्टरांना आणि सर्वसामान्यांनाही आला. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे, आज कोणालाही उपचारासाठी धावाधाव करावी लागत नाही. रुग्णालयांत दाखल होण्याची गरज कमी झाली आहे, तशी वेळ आलीच तर तेथे सुलभपणे प्रवेश मिळत आहे; पण म्हणून सगळे जग ‘नॉर्मल’, पूर्वपदावर आले आहे, असे मानून निर्धास्त-बेफिकीर होणे योग्य आहे काय? अजिबात नाही...

मृत्युदर चिंताजनक

‘आता कसलीच काळजी नाही’ ही मानसिकता बाळगून आरोग्याचे सगळे नियम झुगारणे आजही तितकेच धोकादायक आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील कोरोनामृत्यूंची प्रतिदिन संख्या १० ते १५ आहे. ती सरासरी दहा असल्याचे गृहीत धरले, तर महिनाभराच्या कालावधीत सुमारे तीनशे रुग्ण दगावत आहेत. हा आकडा किरकोळीत घेण्यासारखा नाही. कोरोनाने आतापर्यंत केवळ पुण्यात ९३०० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. त्यामध्ये रोज वाढ होत असतानाही, ‘कोरोना संपला’ असा समज दृढ होत असेल, तर त्यात आत्मविश्‍वासापेक्षा निष्काळजीपणा जास्त आहे.

लोकांची अनास्था

राज्यात ओमिक्रॉनबाधित सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. याचे एक ठळक कारण म्हणजे सुरक्षा नियमांकडे होणारे दुर्लक्ष. लस हे कोरोनाशी करावयाच्या लढाईतील महत्त्वाचे अस्त्र आहे. ही लस सरकारने सर्वांना मोफत उपलब्ध करून दिली आहे. तरीही ती घेण्याबाबत अनेक जण उदासीन आहेत. पुणे जिल्ह्यात लसीकरणासाठी पात्र असलेल्या लोकसंख्येपैकी साडेबारा लाखांपेक्षा जास्त लोकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. एकीकडे ‘बूस्टर डोस’ची (तिसऱ्या डोसची) व्यवस्था केली जात असताना, आधीचेच डोस न घेणाऱ्यांची अनास्था चिंताजनक आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात मंगळवारी १,९०६ नवे कोरोना रुग्ण; १२ जणांचा मृत्यू

दोन्ही डोस घेऊनही...

लस घेतली म्हणजे कोरोना होणारच नाही, याची खात्री नसते; परंतु ‘लसधारी’ व्यक्तीला कोरोनाने गाठले तरी ती लागण सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची असते. रुग्णाला घरी विलगीकरणात उपचार घेऊन बरे होता येते. यात गमतीशीर वाटावा असा एक मुद्दा आहे. ‘लशीचा एक डोस घेतलेले आणि दोन्ही डोस घेतलेले, यांपैकी कोण अधिक सुरक्षित आहे,’ असा प्रश्‍न विचारला, तर त्याचे उत्तर साहजिकच ‘दोन्ही डोस घेणारे’ असे यायला हवे; पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. सरकारी आकडेवारीनुसार, एक डोस घेतलेल्यांपेक्षा दोन्ही डोस पूर्ण करणाऱ्यांचे प्रमाण कोरोनाबाधितांत जास्त आहे!

आकडेवारीतून निघालेला हा निष्कर्ष प्रथमदर्शनी अनाकलनीय वाटेल; पण ती वस्तुस्थिती आहे. हे असे का होत असावे? याचा एक तर्क म्हणजे, लशीचे दोन्ही डोस घेतलेले लोक आपल्याला जणू कोरोनाप्रतिबंधक ‘कवचकुंडले’ प्राप्त झाली आहेत, अशा आविर्भावात निष्काळजीपणे फिरू लागतात. मास्क, शारीरिक अंतर, वैयक्तिक स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर यांपैकी कोणतीही बाब आता आपल्याला लागू नाही, असे वर्तन त्यांचे असते. अशा लोकांकडून नियमभंगाबद्दल प्रशासनाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला आहे. तरीही अवस्था ‘जैसे थे’ आहे. त्यातून उद्‍भवलेल्या परिस्थितीमुळे पुण्यातील कोरोनामृत्यूंचे प्रमाण चिंताजनकच आहे. लोकांतील बेफिकिरीचा संसर्ग दूर झाल्याशिवाय या आजाराची बाधा संपुष्टात येणार नाही!..

Web Title: Ramesh Doiphode Writes Coronavirus Infection

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top