esakal | अबब! रामटेकडी प्रकल्पात डोंगराएवढे ढीग; 60 हजार टन कचरा पडून

बोलून बातमी शोधा

The Ramtekdi project 60000 tons garbage

रोज २५० ते ३०० टनांवर प्रक्रिया होत नसल्याचे स्पष्ट

अबब! रामटेकडी प्रकल्पात डोंगराएवढे ढीग; 60 हजार टन कचरा पडून
sakal_logo
By
उमेश शेळके

पुणे : कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता देऊन देखील शहरात निर्माण होणाऱ्या शंभर टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याचे उघड झाले आहे. नऊ महिन्यांपासून प्रक्रिया न झालेला सुमारे साठ हजार टन सुका व मिश्र कचरा रामटेकडी येथील इंडस्ट्रिअल इस्टेटमधील प्रकल्पावर तसाच पडून असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असताना दुसरीकडे अशा प्रकारे प्रक्रिया न करता केवळ कचरा साठवून ठेवला जात असल्याने अनेक प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दररोज या कचऱ्यामध्ये सुमारे अडीचशे ते तीनशे टन सुका आणि मिश्र कचऱ्याची भर पडत आहे. त्यावर तातडीने प्रक्रिया करून विल्हेवाट लावली नाही तर महिन्याभरात हा आकडा एक लाख टनांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेने आतापर्यंत सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे १ हजार २७५ टन क्षमतेच्या दहाहून अधिक प्रकल्पांना मान्यता दिली आहे; परंतु या सर्व प्रकल्पांमध्ये केवळ ७५० टन कचऱ्यावरच प्रक्रिया होते. त्यामुळे राहिलेला सर्व कचरा रामटेकडी येथील डेपोमध्ये नेऊन टाकला जात आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कचऱ्याचे डोंगराप्रमाणे उंच ढीग लागले आहेत.

वास्तविक २०१६ मध्ये घनकचरा हाताळणी व प्रक्रिया नियम लागू झाले. या नियमात कचऱ्याचे डंपिंग करण्यास बंदी घालण्यात आली. तर प्रक्रिया करणे बंधनकारक झाले. २०१९ मध्ये हरित लवाद न्यायालयाने कचऱ्याचे ‘ओपन डंपिंग’ करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ऑगस्टपासून उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये डंपिंग बंद करण्यात आले. रामटेकडी येथील कचरा डेपोमध्ये असलेल्या रोकेम प्रकल्पाची दररोज ७०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. प्रत्यक्षात मात्र तेथे २०० टनच कचऱ्यावर प्रक्रिया होते. अशी अवस्था अन्य कचरा प्रकल्यांच्या ठिकाणी देखील आहे. त्यामुळे रोजचा २५० ते ३०० टन कचरा प्रक्रिया न करता शिल्लक राहत आहे. उरुळी देवाची येथे २०० टन मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा मान्यता देण्यात आलेला प्रकल्प अद्याप उभा राहिलेला नाही.

कचरा प्रक्रिया प्रकल्प, क्षमता (टनांमध्ये) प्रत्यक्षात होणारी प्रक्रिया (टनांमध्ये)
रामटेकडी (हडपसर) ७०० २००
कात्रज ५० ५०
वडगाव १५० १७५
रामटेकडी ७५ ७५
वडगाव शेरी २५ २५ हांडेवाडी २५ २५ केशवनगर ५० ५०
सुखसागरनगर ५० ५०
केशवनगर १०० ५०
धायरी ५० ५०

एकूण १२७५ ७५०

आंबेगाव येथील दोनशे टन प्रकल्पाला आग लागल्याने आणि उरूळी देवाची येथील २०० टन कचरा प्रक्रिया प्रकल्पाला मान्यता उशिरा मिळाल्याने या कचऱ्यावर प्रक्रिया होऊ शकली नाही. त्यामुळे तो साठवावा लागला. आता रामटेकडी येथे नवीन ७५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा प्रकल्पाची निविदा काढली आहे. लवकरच त्या ठिकाणीही प्रकल्प सुरू करण्यात येईल.

-अजित देशमुख, प्रमुख, घनकचरा विभाग, पुणे महापालिका