पुणे : शहरातील गुन्हेगारी होतीये कमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

- खून वगळता अन्य गुन्हेही झाले कमी 

- गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण 67 टक्‍क्‍यांवर

- शहर पोलिस वार्षिक गुन्ह्यांबाबत अहवाल जाहीर

पुणे : शहरातील संघटित गुन्हेगारीसह अन्य गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेली प्रतिबंधात्मक कारवाई अवैध धंद्यावरील छापे व अन्य कारवायांमुळे गुन्ह्यांचे प्रमाण घटले. मागील वर्षभरात आठ हजार 677 गुन्हे दाखल असून, गंभीर गुन्हे नऊ टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत. खुनाच्या घटना वगळता वगळता अन्य गुन्ह्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. याबरोबरच गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही 67 टक्‍क्‍यांवर पोचल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहरामध्ये 2019 मध्ये घडलेल्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी पोलिस आयुक्तालयामध्ये वार्षिक पत्रकार परिषद घेण्यात आली. पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी त्याबाबत माहिती दिली. यावेळी पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतूक) डॉ. संजय शिंदे उपस्थित होते. 

शहरामध्ये 2018 मध्ये नऊ हजार 552 इतके गंभीर गुन्हे दाखल होते, तर 2019 मध्ये आठ हजार 677 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये 900 गंभीर गुन्हे कमी झाले. त्यामुळे गंभीर गुन्हे नऊ टक्‍क्‍यांनी कमी झाले. मागील वर्षी शहराच्या वेगवेगळ्या भागात शरिराविरुद्ध एक हजार 245 गुन्हे दाखल झाले होते, त्यापैकी पोलिसांनी एक हजार 225 गुन्हे उघडकीस आणले. मालमत्ता चोरीचे 3760 गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी 1509 गुन्हे उघडकीस आले आहेत. 

"शहरात 2019 मध्ये 18 सराईत गुन्हेगारांवर "एमपीडीए'ची तर 179 गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई केली. तर साडे पाच हजारांहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करतानाच अवैध धंद्ये बंद करण्यासही प्राधान्य दिले.त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविता आले. परंतु तेवढ्यावरच समाधान न मानता मागील वर्षीच्या सर्व आकडेवारीचे योग्य संस्थेमार्फत विश्‍लेषण करुन नागरीकांना सुरक्षितता देण्यास प्राधान्य देण्यात येईल.''

- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त. 

"मागील वर्षी शहरातील गुन्ह्यांमध्ये घट झाली, यंदा आम्ही त्यापेक्षा चांगले काम करून गुन्हे कमी करण्याचे प्रमाण आणखी कमी करण्यास प्राधान्य राहील.''

- डॉ.रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त. 

मागील वर्षी घडलेले गुन्हे उघडकीस आलेले गुन्हे 

गंभीर गुन्हे - 8677 - 5929 
शरिराविरुद्धचे गुन्हे - 1245 - 1225 
मालमत्ता चोरी - 3760 - 1509 
खुन - 74 - 71 
खुनाचा प्रयत्न - 121 - 120 
मारहाण - 155 - 152 
दुखापत - 895 - 882 
दरोडा - 20 - 19 
जबरी चोरी - 157 - 132 
घरफोडी - 460 - 257 

महिला सुरक्षिततेचा प्रश्‍न कायम 

शहरामध्ये 2018 मध्ये बलात्काराच्या 239 घटना घडल्या. त्यापैकी 239 घटना उघडकीस आणण्यात आल्या होत्या. तर विनयभंगाच्या 517 घटनांपैकी 510 गुन्हे उघडकीस आले होते. तर 2019 मध्ये शहरात बलात्काराच्या 224 घटना घडल्या. त्यापैकी 222 घटना उघडकीस आल्या. विनयभंगाच्या 419 घटना घडल्या, त्यापैकी 409 घटना उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यात आली. 2018 च्या तुलनेत बलात्कारच्या घटना अवघ्या 6 टक्‍क्‍यांनी, तर विनयभंगाच्या घटना 19 टक्‍क्‍यांनी कमी करता आल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rate of Crime Decreased in Pune Previous Year 2019