esakal | रेशन दुकानदार संपावर गेल्यामुळे मोफत मिळेना धान्य

बोलून बातमी शोधा

Strike
रेशन दुकानदार संपावर गेल्यामुळे मोफत मिळेना धान्य
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुण्यासह राज्यातील रेशन दुकानदार (Ration Shopkeeper) संपावर (Strike) गेल्यामुळे चार दिवसांपासून शिधापत्रिकाधारकांना धान्य (Grain) मिळालेले नाही. राज्य सरकारने कोरोनाच्या (Corona) कालावधीत गरीब नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी एक महिन्याचे धान्य मोफत (Free Grain) देण्याची घोषणा केली. परंतु या संपामुळे गरीब नागरिकांना (Poor People) तेही धान्य मिळत नाही. दरम्यान, राज्य सरकारच्या पातळीवर याबाबत प्रयत्न सुरू असून, संप मिटण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रशासनाकडून (Administrative) देण्यात आली. (Ration shopkeepers go on strike So dont get free grain)

राज्य सरकारने रेशन दुकानदारांना कोरोना कालावधीत विमा संरक्षण कवच द्यावे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी धान्य वितरित करताना इ-पॉस मशिनवर शिधापत्रिकाधारकांच्या ऐवजी रेशन दुकानदाराच्या बोटाचा ठसा घ्यावा, यासह विविध मागण्या रेशन दुकानदार संघटनेकडून करण्यात आल्या आहेत. रेशन दुकानदारांनी एक महिन्यापूर्वी संपाचा इशारा दिला होता. परंतु सरकारकडून त्याबाबत कोणतेही पावले उचलण्यात आली नाहीत. त्यामुळे रेशन दुकानदार एक मे पासून संपावर गेले आहेत. त्यामुळे चार दिवसांपासून रेशनवरील धान्य वितरण बंद आहे. याचा फटका गरीब, दुर्बल घटकांमधील शिधापत्रिकाधारंकाना बसत आहे.

हेही वाचा: हरायचं नाही...लढायचं! एकाच कुटुंबातील 5 जण कोरोनामुक्त

राज्य सरकारने एप्रिलच्या मध्यास मोफत गहू आणि तांदूळ देण्याची घोषणा केली. परंतु तोपर्यंत बहुतांश शिधापत्रिकाधारकांनी पैसे देऊन धान्य खरेदी केले होते. त्यामुळे अन्नधान्य वितरण विभागाकडून लाभार्थ्यांना मे महिन्याचे धान्य मोफत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे संपामुळे धान्य मिळत नाही, अशी अवस्था आहे.

कोरोनाच्या संकटातही रेशन दुकानदार जोखीम पत्करून धान्य वितरित करीत आहेत. कोरोनामुळे शहरातील काही रेशन दुकानदारांचा बळी गेला आहे. तरीही राज्य सरकार रेशन दुकानदारांना विमा संरक्षण कवच देत नाही. सरकारकडून लेखी स्वरूपात मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरूच राहील.

- गणेश डांगी, शहराध्यक्ष- रेशन दुकानदार संघटना, पुणे

रेशन दुकानदारांच्या प्रमुख मागण्या -

  • रेशन दुकानदारांना विमा संरक्षण कवच देण्यात यावे

  • धान्य वाटप करण्यासाठी दुकानाची वेळ निश्चित करावी

  • रेशन दुकानदारांना अत्यावश्यक पास द्यावेत

  • कोरोनामुळे मृत झालेल्या रेशन दुकानदारांना नुकसानभरपाई मिळावी

  • पंतप्रधान योजनेतील गेल्या नोव्हेंबर महिन्यातील तांदूळ आणि चार महिन्यांची डाळ उपलब्ध करून द्यावी

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा