
Kasaba Bypoll Election : "बोगस मतदान करण्याचा रवींद्र धंगेकरांचा प्रयत्न"; भाजपची पोलिसात तक्रार
Kasaba Bypoll Election : कसबा पोटनिवडणुकीत प्रचार थांबला तरी राजकीय वार थांबले नाहीत. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात भाजप नेते एकवटले आहेत. भाजपच्या शिष्टमंडळाने धंगेकर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आचारसंहीतेचा भंग केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
भाजपने पोलिसांच्या हातून कसब्यात पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यांनी आज भाजप विरोधात उपोषण देखील केले. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर धंगेकर यांनी उपोषण मागे घेतले. मात्र आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत.
भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, कसब्यात बोगस मतदार आणून बोगस मतदान करण्याचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आज आम्ही पोलिसांना सगळे केंद्र सांगितले जिथे बोगस मतदान करण्याची तयारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.
काल पाच वाजचा प्रचार थांबला असताना देखील महाविकास आघाडीच्या उमेदवाराने उपोषणाचा बनाव केला. याच्या पाठीमागे त्यांनी प्रचार केला. त्यामुळे त्यांचा निवडणूक अर्ज रद्द करण्याची मागणी आम्ही केली आहे. यासाठी आम्ही आयोगात तक्रार दाखल करणार आहोत, असे जगदीश मुळीक म्हणाले.