
Kasba By Election 2023: कसब्यातील 'त्या' भाषणामुळे फडणवीसांच्या अडचणी वाढणार? धंगेकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
Kasba By Election 2023: राज्यभरात प्रचंड चर्चा असलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काही तासांमध्ये कसब्याचा निकाल स्पष्ट होऊ लागला आहे. मात्र, या निकालापूर्वीच भाजप आणि काँग्रेसमध्ये वादाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे.
काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडून भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कसब्यातील प्रचारसभेच्या दरम्यान भाषण केले होते.
या भाषणामध्ये त्यांनी कसबा हा हिंदुत्ववाद्यांचा गड असल्याचं म्हटलं होते. त्याचबरोबर पुण्येश्वर महादेवाच्या मंदिराचा मुद्दा उपस्थित करत धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न भाजपकडून झाल्याची चर्चा होती.
याच गोष्टींवर आक्षेप घेत रवींद्र धंगेकर यांनी फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
कसबा हा हिंदुत्ववाद्यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे कोणी कितीही पद्धतीने नरेटिव्ह रचण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा फरक पडणार नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात पुण्येश्वर महादेवाच्या मंदिराचा उल्लेख केला होता.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्येश्वर मंदिराबाबतची भूमिका स्पष्ट करावी, असे त्यांनी म्हटले होते. लढाई हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी नाही, तर वैचारिक लढाई आहे.
३७० कलम समर्थक आणि ३७० कलम विरोधक अशी ही लढाई आहे. कसब्यातील ब्राह्मण समाज नाराज नाही, ती केवळ अफवा होती, असेही फडणवीस यांनी सांगितले होते.
या माध्यमातून देवेंद्र फडणवीस समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आक्षेप रवींद्र धंगेकर यांनी घेतला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.