खासदार अमोल कोल्हे यांना मिळाला बालपणीचा 'खजिना'

सागर दिलीपराव शेलार
Wednesday, 26 August 2020

खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी आपल्या बालपणीची एक आठवण फेसबुकवर शेअर करताच पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. त्यांनी आपला बालपणीचा Airmail शाईपेनासोबतचा एक अनुभव शेअर केला आहे. 

पुणे : राष्ट्रवादीचे खासदार व अभिनेते डाॅ. अमोल कोल्हे अनेक कारणांनी सोशल मीडियात सतत चर्चेत असतात. आज देखील ते अशाच एका कारणामुळे सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. त्यांनी आपल्या बालपणीची एक आठवण फेसबुकवर शेअर करताच ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी आपला बालपणीचा Airmail शाईपेनासोबतचा एक अनुभव शेअर केला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, त्यांनी शेअर केलेल्या शाईपेनाच्या अनुभवास फेसबुकवर मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत. खासदार कोल्हे हे अभिनेते म्हणून जेवढे प्रसिद्ध आहेत, तेवढेच त्यांच्या सामाजिक कामातून ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा संसदेतील पहिल्याच टर्ममधील ठसा वाखाणण्यासारखा आहे. त्यांची संसदेमधील भाषणे देखील लक्षवेधी ठरत आहेत. 

वरिल सगळ्या माधयमातून डाॅ. कोल्हे नेहमीच चर्चेत असतात, आज मात्र ते त्यांच्या बालपणीच्या एका आठवणीमुळे चर्चेत आहेत. त्यांनी फेसबुकवर शेअर केलेली ही आठवण नागरिकांचे लक्ष वेधत आहे. त्यांनी आपल्या शेअर केलेल्या लहानपणीच्या आठवणीमुळे अनेकांना आपले शालेय जीवनाची आठवण करून देते. त्यांनी आपल्या वाॅलवर लिहिलेली पोस्ट पुढीलप्रमाणे आहे. 

शालेय जीवनातील खजिना!

लहानपणापासून शाईपेन या गोष्टीशी नातं जोडलं गेलं. आधी 'बॉलपेन मुळे अक्षर बिघडेल' या भीतीने आणि नंतर शाईपेनने अक्षराचं कौतुक मिळालं म्हणून. या Airmail च्या पेनला एक प्रतिष्ठा होती माझ्या शालेय जीवनात. ज्यांच्या अक्षरावर भाळायचो अशा काही शिक्षकांच्या खिशाला लावलेला हा पेन लक्ष वेधून घ्यायचा. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर माझ्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांसाठी हा पेन म्हणजे सुद्धा चैन होती. मग पहिला नंबर आला की वडील कौतुकानं हा पेन घेऊन द्यायचे. मग नारायणगाव मधील 'अशोक बुक' डेपो मध्ये जाऊन अशोककाका गांधींकडून हा पेन घेताना जग जिंकल्याची भावना असायची. लवकरच लक्षात आलं की केवळ पेन असून भागत नाही तर हाताला वळणही असावं लागतं. हा संस्कार माझ्या गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिरातील श्री.गाढवे सर, श्री. माकर सर आणि श्री. धानापुणे सरांनी केला. त्यामुळेच वाचता येईल इतपत अक्षर अजूनही बरं राहिलं. त्यानंतर Fountain पेन यागोष्टीविषयी कायमच ममत्व राहिलं.. पण मध्ये बराच काळ शोधूनही हा Airmail पेन काही मिळेना. अचानक काही दिवसांपूर्वी ऑनलाइन मिळाला. तो हाती आल्यावर मी एवढा का हरखून गेलो हे मुलांनाही सांगता येईना. Gel पेन ची सवय झालेल्या मुलांसाठी हे अप्रूप होतं.

माझ्या शालेय जीवनातील खजिना पुन्हा गवसल्याच्या आनंदात विचार चमकून गेला, "अचानक पेनातील शाई संपल्याने होणारी धांदल, ती शाई भरतानाची कसरत, dropper वापरतानाची तारांबळ, शाई निबमध्ये येण्यासाठीचे प्रयत्न, बाहेर आलेली शाई सवयीने केसाला पुसणं, ग्रिप चुकली की शाईने माखणारी बोटं आणि एवढया सायासानंतर कागदावर मनासारखं अक्षर उमटल्यानंतर चेहऱ्यावर उमटणारा आनंद" आताच्या पिढीला समजेल?.... नकळत एक पेन लेकीच्या हातात ठेवला... संस्कार प्रवाही ठेवायला हवा..पेनातील शाईसारखा... वळण लागलं तर अक्षरही उमटेल..मनासारखं!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खासदार कोल्हे यांनी अनेकांना आपल्या शाईपेनाच्या व आठवणीव्दारे शालेय जीवनाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या करावयास भाग पाडले आहे. कोल्हे यांच्या या पोस्टमुळे सर्वांच्याच शालेय जीवन, परिक्षा, पेपर, वडिलांचे काैतुक या सर्व आठवणी ताज्या होत आहेत. 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read a childhood experience of mp Amol Kolhe on Facebook