बांधकाम क्षेत्राला पुण्यात 'अच्छे दिन' 

home
home

पुणे : सरकारने नोटाबंदी, महारेरा आणि जीएसटी अशा एकापाठोपाठ घेतलेल्या निर्णयामुळे घर व जमीन खरेदी-विक्रीत चढ-उतार निर्माण झाला होता. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात घर, जमीन खरेदीच्या दस्त नोंदणीत सातत्याने चांगली वाढ होत आहे. तसेच दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर घर खरेदी-विक्री व्यवसायात तेजी आहे. या आर्थिक उलाढालीमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये आश्‍वासक चित्र निर्माण झाले असून बांधकाम क्षेत्रातील अनिश्‍चितता संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे. 

यावर्षी गेल्या महिन्यात दस्त नोंदणीतून 376 कोटींचा महसूल जमा झाला. महसुलाच्या साधारण सोळा पट व्यवसायाची उलाढाल मानली जाते. या हिशेबाने फक्त ऑक्‍टोबरमध्येच पुण्यात फ्लॅट व जमीन खरेदी विक्रीच्या क्षेत्रात सुमारे सहा हजार कोटींची उलाढाल झाली आहे. 

गेल्या काही महिन्यांत नोकरी आणि उद्योग व्यवसायांवर काहीशी मरगळ आली होती. नोटबंदी, महारेरा आणि जीएसटीमुळे अनेक बांधकाम व्यावसायिक खासगीत नाराजी व्यक्‍त करीत होते. तर, फ्लॅटचे दर कमी होतील, या अपेक्षेपोटी ग्राहक थोडे थांबू, या भूमिकेत होते. परंतु गेल्या चार महिन्यांपासून ग्राहकांचा घर खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. दिवाळी आणि सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर बांधकाम साईटवर फ्लॅट पाहण्यासाठी ग्राहकांची रेलचेल वाढली आहे. तसेच, येथील सह जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीत वाढ झाली आहे. त्यावरून घर खरेदीदारांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. 

तुलनात्मक आकडेवारी 

जुलै 2017 ते ऑक्‍टोबर 2018 
महिना मुद्रांक शुल्क, प्राप्त महसूल (रुपयांत) 

जुलै 2017 250 कोटी 79 लाख 
ऑगस्ट 269 कोटी 30 लाख 
सप्टेंबर 288 कोटी 18 लाख 
ऑक्‍टोबर 269 कोटी 25 लाख 
नोव्हेंबर 301 कोटी 57 लाख 
डिसेंबर 336 कोटी 04 लाख 
जानेवारी 2018 353 कोटी 25 लाख 
फेब्रुवारी 303 कोटी 46 लाख 
मार्च 459 कोटी 51 लाख 
एप्रिल 299 कोटी 66 लाख 
मे 335 कोटी 28 लाख 
जून 333 कोटी 80 लाख 
जुलै 361 कोटी 82 लाख 
ऑगस्ट 377 कोटी 46 लाख 
सप्टेंबर 357 कोटी 35 लाख 
ऑक्‍टोबर 376 कोटी 06 लाख 

दसऱ्याला 52 लाखांचा महसूल 
दसऱ्याच्या मुहुर्तावर शहरात दस्त नोंदणीसाठी सुटीच्या दिवशी चार दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. यादिवशी 38 मालमत्तांची दस्त नोंदणी करण्यात आली. त्यातून सरकारला 52 लाख 34 हजार रुपयांचा महसूल जमा झाला. 

मुद्रांक शुल्क आकारणी दर 
महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील दस्त नोंदणीसाठी मालमत्तेच्या बाजार मूल्याच्या पाच टक्‍के आणि एक टक्‍का स्थानिक अधिभार असे एकूण सहा टक्‍के मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. तर, ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात चार टक्‍के आणि एक टक्‍का स्थानिक अधिभार असा एकूण पाच टक्‍के मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. 

मर्यादित बजेटनुसार एक वर्षापासून घराच्या शोधात होतो. नव्या घरापासून काही अंतरावर आयटी कंपनी आहे. दरात थोडी सवलत दिल्यामुळे फ्लॅट घेणे शक्‍य झाले. आजच रजिस्ट्री केली. स्वत:चे घर घेतल्याचा आनंद आहे. 
- अनुप मंडल, आयटी ऍनॅलिस्ट, वाघोली 

दसरा-दिवाळीच्या मुहुर्तावर घर खरेदीसाठी बुकिंग वाढते. गेल्या काही दिवसांपासून दस्त नोंदणीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्काच्या वसुलीमुळे महसुलामध्येही वाढ झाली आहे. 
- जी. एस. कोळेकर, सह जिल्हा निबंधक, पुणे 

गेल्या तीन-चार महिन्यांपासून बांधकाम क्षेत्रात सकारात्मक बदल होत आहेत. पुण्यात घरांचे दर पूर्वीपासूनच वाजवी आहेत. "महारेरा' कायदा लागू झाल्यानंतर या क्षेत्रात सध्या स्थिरता आल्यामुळे लोकांच्या मनातील भीती गेली आहे. त्यामुळे गृह खरेदी-विक्रीच्या व्यवसायात चांगली सुधारणा होत आहे. 
- सतीश मगर, राष्ट्रीय अध्यक्ष, क्रेडाई 

गेली दोन वर्षे बांधकाम क्षेत्रात निराशेचे वातावरण होते; परंतु तो निरुत्साह दूर झाल्यामुळे बांधकाम क्षेत्रात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ही आनंदाची बाब असून, यापुढील काळात आणखी तेजी वाढेल. 
- गजेंद्र पवार, माजी अध्यक्ष, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना 

गेल्या काही दिवसांपासून, विशेषत: नवरात्रीदरम्यान ग्राहकांमध्ये घर खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. गेली काही महिने दर स्थिर असून, यापुढे दर आणखी खाली येणार नाहीत, याची कल्पना आल्यामुळे ग्राहक घर खरेदी करीत आहेत. यापुढेही घर खरेदीचा हा उत्साह कायम राहील. "महारेरा'सारख्या कायद्यांमुळे बांधकाम व्यवसायाला एक शिस्त आली आहे. 
- श्रीकांत परांजपे, अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com