क्षेत्रीय कार्यालय बनले कचराकुंडी! 

अविनाश पोफळे
रविवार, 21 मे 2017

क्षेत्रीय कार्यालयातील पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेचा वापर अतिक्रमण कारवाईद्वारे जप्त केलेले साहित्य ठेवण्यासाठी करण्यात येत आहे. पार्किंगमध्येही या राडारोड्याचे एकावर एक थर टाकले आहेत. तसेच क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात आणि चौकशी कक्षातही हा राडारोडा टाकण्यात आला आहे. 

पुणे - महापालिकेने अतिक्रमणाची कारवाई करून जप्त केलेल्या हातगाडी, फलक, कॅरेट्‌स आदी साहित्याने गोदाम भरली आहेत. त्यामुळे वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाने जप्त केलेले साहित्य आता क्षेत्रीय कार्यालयाच्या पार्किंगमध्ये ठेवण्याची वेळ अतिक्रमण विभागावर आली असून, ही जागासुद्धा भरली आहे. परिणामी, क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारासह चक्क चौकशी कक्षातही या राडारोड्याचा ढीग लागला आहे. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाचे आवार कचराकुंडी बनले आहे. 

क्षेत्रीय कार्यालयातील पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेचा वापर अतिक्रमण कारवाईद्वारे जप्त केलेले साहित्य ठेवण्यासाठी करण्यात येत आहे. पार्किंगमध्येही या राडारोड्याचे एकावर एक थर टाकले आहेत. तसेच क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात आणि चौकशी कक्षातही हा राडारोडा टाकण्यात आला आहे. 

याबाबत वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे निरीक्षक राजेश खोडे यांच्याकडे चौकशी केली. त्या वेळी खोडे म्हणाले, ""शहरातील क्षेत्रीय कार्यालयांना जप्त केलेले साहित्य ठेवण्यासाठी पाच गोदामे आहेत. ती जप्त केलेल्या साहित्याने पूर्णपणे भरली आहेत. अतिक्रमणच्या मुख्य कार्यालयामार्फत तेथील साहित्याचा लिलाव लावलेला आहे. तो झाल्यानंतर सगळे साहित्य त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येईल. गोदामामध्ये जागा नसल्याने हे साहित्य तात्पुरते पार्किंगमध्ये ठेवले आहे. शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांची अशीच परिस्थिती आहे.'' 

जप्तीनंतरची प्रक्रिया... 
वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या पार्किंगमध्ये मागील कित्येक महिन्यांपासून जप्त केलेले साहित्य पडलेले आहे. त्यातील बरेचसे साहित्य गंजले असून, काही साहित्याचे भंगार झाले आहे. याबाबत खोडे यांना विचारल्यानंतर ते म्हणाले, ""भाजीपाला, फळे असा नाशवंत माल, तसेच गॅस सिलिंडर अशा स्फोटक वस्तूंची त्वरित पावती केली जाते. हातगाड्याचीही पावती तीन दिवसांत होते. पार्किंगमधील बरेच साहित्य पंधरा दिवसांपूर्वीपासून जप्त केलेले आहे. काही साहित्य जुनेही आहे. सहा महिने होऊनदेखील विक्रेते ते घेऊन न गेल्याने साहित्य गोदामात टाकले आहे.'' 

Web Title: regional office became a garbage spot in pune

टॅग्स