येरवडा कारागृहातून ४१८ कच्च्या कैद्यांची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yerwada Central Jail

सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृह हे राज्यातील सर्वाधिक क्षमतेचे कारागृह आहे. या कारागृहातील कैद्यांची संख्या सध्या क्षमतेपेक्षा तिप्पटीने अधिक आहे.

येरवडा कारागृहातून ४१८ कच्च्या कैद्यांची सुटका

पुणे - क्षमतेपेक्षा जास्त आरोपी, कच्चे कैदी आणि कैदी असलेल्या कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने देशभरात ‘रिलीज- अंडर ट्रायल रिव्हू कमिटी (यूटीआरसी) @ ७५’ हा विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत येरवडा कारागृहामधून महिन्याभरात ४१८ कच्च्या कैद्यांची सुटका करण्यात आली आहे.

सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृह हे राज्यातील सर्वाधिक क्षमतेचे कारागृह आहे. या कारागृहातील कैद्यांची संख्या सध्या क्षमतेपेक्षा तिप्पटीने अधिक आहे. कारागृहात कच्चे कैदी अधिक दिवस राहू नयेत. विशेषतः तरुण कैदी जास्त वेळ कारागृहात न राहाता त्यांचे पुनर्वसन कसे करता येईल या दृष्टीने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत १६ जुलैला या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. या प्रकल्पासाठी १६ निकष निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने फौजदारी दंड संहिता (सीआरपीसी) कलम ४३६ (जामीनपात्र गुन्हा) आणि ४३६ अ चा समावेश आहे. या निकषांमध्ये १६ जुलै ते १३ ऑगस्टपर्यंत जे कैदी पात्र ठरले त्यांची सुटका करण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख, यूटीआरसी कमिटीचे प्रमुख व जिल्हा न्यायाधीश ए. एस. वाघमारे, पुणे जिल्हा विधी प्राधिकरण सचिव मंगल कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा कारागृहात हा प्रकल्प राबविण्यात आला. कारागृह अधीक्षक राणी भोसले आणि वरिष्ठ तुरुंग अधिकारी पल्लवी कदम यांनी या प्रकल्पासाठी सहकार्य केले.

सर्वोच्च न्यायालयाने हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालय आणि कारागृह प्रशासनाची मीटिंग घेऊन कैद्यांची सर्व माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर दर आठवड्याला मीटिंग घेऊन जास्तीत जास्त कैद्यांची सुटका करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमाची पूर्ण माहिती कारागृहातील रेडिओ सेंटर वरून देण्यात आली.

- मंगल कश्यप, सचिव पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

कैद्यांच्या सुटकेचे प्रमुख निकष -

- कैद्याचे वय १९ ते २१ दरम्यान आहे

- पहिलाच गुन्हा आहे

- गुन्ह्याची शिक्षा सात किंवा त्यापेक्षा कमी वर्ष आहे

- शिक्षेतील एक चतुर्थांश काळ तुरुंगात आहे

- कैद्याचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त आहे

- सुटकेसाठी एकूण १६ निकष

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील स्थिती -

- कैद्यांची अधिकृत क्षमता २,३२३ (पुरुष) आणि १२६ (महिला) - एकूण २,४४९

- सद्यस्थितील असलेले कैदी - ६,७२३ (पुरुष) आणि २९८ (महिला) अधिक ६ तृतीयपंथी - ७०२७ कैदी आहेत.

कच्चे कैदी म्हणजे काय

एखाद्या गुन्ह्यातील आरोपी ज्याच्या विरोधात दाखल गुन्ह्यानुसार खटला सुरू आहे. मात्र अद्याप न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावलेली नाही.

तर पुन्हा कारागृहात जावे लागेल

कच्च्या कैद्यांची सुटका करण्यात आली असली तरी त्याला त्याच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्यासाठी न्यायालयात हजर होणे गरजेचे आहे. गुन्ह्यात निर्दोष सुटका झाली व त्या विरोधात अपील झाले नाही तर तो कैदी कायमस्वरूपी तुरुंगाबाहेर राहील. मात्र न्यायालयाने जर त्याला शिक्षा सुनावली तर त्याला पुन्हा तुरुंगात जावे लागणार नाही.

Web Title: Release Of 418 Raw Prisoners From Yerawada Central Jail

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..