esakal | रेमडेसिवीर, ऑक्सिजन पुरवठा लवकरच सुरळीत होईल : डॉ. अमोल कोल्हे

बोलून बातमी शोधा

dr. amol kolhe
रेमडेसिवीर, ऑक्सिजन पुरवठा लवकरच सुरळीत होईल : डॉ. अमोल कोल्हे
sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील

मंचर : कोरोना प्रतिबंधक उपचार करताना ग्रामीण भागात रेमडिसिवीर, ऑक्सिजन, व्हेटिंलेटर बेडची उपलब्धता व अन्य समस्यांच्या सोडवणुकीसाठी मागणी वाढत आहे. त्यानुसार रेमडेसिवीर, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा सुरू असून, लवकरच त्याची पूर्तता होईल, असा विश्वास शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. कोरोना प्रतिबंधक उपचार या विषयावर मुंबईतील केईएम हॉस्पिटल कोविड आयसीयूचे इनचार्ज व नेस्को कोविड सेंटरचे डीन डॉ. संतोष सलागरे यांनी जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर व हवेली तालुक्यांचे आरोग्य अधिकारी, शासकीय व खासगी रुग्णालयांचे डॉक्टर व पत्रकारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. ८५ डॉक्टर सहभागी झाले होते. डॉ. सलागरे यांनी ग्रामीण भागात रेमडेसिवीर, ऑक्सिजन, व्हेटिंलेटर बेडची उपलब्धता व अन्य समस्यांवर सविस्तर चर्चा केली.

हेही वाचा: जुन्नर तालुक्यात ऑक्सिजन सिलेंडरची तीव्र टंचाई

डॉ. कोल्हे म्हणाले, “ग्रामीण भागातही रेमडेसिवीरची मागणी वाढली आहे. परंतू पुरवठा कमी असल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे उपचार करताना रेमडेसिवीर ऐवजी फॅव्हीपॅरावीर या पर्यायी औषधांचा वापर केला तर फायदा होईल. अत्यावश्यक असेल तरच रेमडेसिवीरचा वापर करावा प्लाझ्मा थेरेपी संदर्भात अधिक माहिती देताना डॉ. कोल्हे यांनी सांगितले की, प्लाझ्मा थेअरेपीच्या राज्य सरकारच्या क्लिनीकल ट्रायल्स बंद झाल्या आहेत. तरीही काही हॉस्पिटल्स व डॉक्टरांकडून प्लाझ्माचा आग्रह धरला धरतो. त्यामुळे रेमडेसिवीर आणि प्लाझ्मा मिळविण्यासाठी नातेवाईकांची धावपळ होते. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडच्या पूर्ततेसाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच आवश्यक मनुष्यबळ उपलब्धतेसाठी देखील पाठपुरावा सुरू आहे. त्यावर उपाय म्हणून तातडीने ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांशी संपर्क साधून औंध येथील जिल्हा निर्मिती प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. सीएसआर निधीतून औद्योगिक क्षेत्रातच प्रकल्प सुरू करता येईल. का याची चाचपणी जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. एखाद्या रुग्णालयाला स्वतःसाठी ऑक्सिजन प्लांट उभारायचा असेल तर असे प्लांट उभारणाऱ्या कंपन्यांशी समन्वय साधून देण्याची तयारी दर्शवली.

हेही वाचा: प्लाझ्मा तुटवडा रोखण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांना एफडीएचे आदेश

जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, आंबेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गाढवे, शिरूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोरे व हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, डॉ. अजय पंडित, डॉ. भगवान काकणे, डॉ. इंदिरा पारखे, डॉ. राजेंद्र मोहिते, डॉ. किरण जाधव, डॉ. भूषण साळी, डॉ. प्रशांत दौंडकर, डॉ. चेतन कर्डिले, ज्येष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील, सचिन कांकरिया यांनी चर्चेत भाग घेतला. कोरोनाचे महाभयंकर संकट रोखण्यासाठी डॉक्टर, परिचारिका व प्रशासन अत्यंत अफाट काम करत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर लुबाडतात, ही भावना दूर होण्यासाठी प्रत्येक दवाखान्याच्या समोर शासकीय दर पत्रक लावा. रेमडेसिवीर इंजेक्शनचा स्टॉक फलकावर लावा. त्यामुळे गैरसमज दूर होतील. डॉक्टर व रुग्ण यामध्ये विश्वास निर्माण करण्याची ही संधी आहे. -डॉ. अमोल कोल्हे, खासदार.