आठवण पानशेतच्या पुराची : तडाखा आणि उभारी

आठवण पानशेतच्या पुराची : तडाखा आणि उभारी

12 जुलै 1961. पानशेत धरण फुटून मुठेला आलेल्या महापुरात पुण्याची वाताहत झाली. या महाप्रलयाला आज 60 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त नव्या पिढीला या आपत्तीची थोडी फार कल्पना यावी, यासाठी "सकाळ'चे वाचक भास्कर दाते यांनी कळविलेला अनुभव.

12 जुलैचा तो दिवस माझ्या अजून स्मरणात आहे. "सकाळ'च्या पहिल्याच पानावर "पानशेत धरणाच्या एका भिंतीचा भाग खचत चालला आहे. दुरुस्तीचे काम तेथील कर्मचारी जीव तोडून करीत आहेत,' ही छायाचित्रासह बातमी आली होती. परंतु येणाऱ्या गंभीर प्रसंगाची कल्पना त्या वेळी पुणेकरांना आली नसावी.

सकाळी वर्गमित्राबरोबर गरवारे महाविद्यालयात जाताना संभाजी पुलावर बरीच गर्दी दिसली. सर्व जण पुलाखालून वाहणाऱ्या पुराचे लोंढे बघत होते. हा पूर नेहमीपेक्षा वेगळा वाटत होता. पाण्याचा रंग गढूळ पाण्यासारखा काळा- प्रवाहाबरोबर मोठी झाडेझुडपे वाहत होती. पाणी पुलाच्या खाली पाच फुटांवर होते. कर्वे रस्त्याला जाईपर्यंत पाणी रस्त्याला लागले होते. मी माघारी फिरलो.

अलका टॉकीज चौकापर्यंत पाणी येऊ लागले होते. थोड्याच वेळात ते पुलावरून वाहू लागले, तेव्हा पानशेत धरण फुटल्याची कल्पना लोकांना आली. सर्वांची धावपळ सुरू झाली. दुपारी बाराच्या सुमारास नदीजवळील रस्त्यांवर पाणी जोरात घुसले. बायकामुलांना घेऊन लोक सुरक्षित जागी पळू लागले. पाण्याच्या तडाख्याने मातीची घरे धडाधड कोसळत होती. घरातील चीजवस्तू, मुकी जनावरे लोकांच्या डोळ्यासमोर वाहून जात होती. दुपारी चारपर्यंत पुण्यातील नदीजवळचा सखल भाग दीड मजला पाण्याखाली होता. शनिवार, नारायण, कसबा, शिवाजीनगर, सोमवार, रास्ता आणि मंगळवार या पेठा पाण्याखाली होत्या. अलका, डेक्कन, हिंदविजय, विजय, भानुविलास ही सिनेमागृहे पाण्यात होती. खडकी, पिंपरी, चिंचवड भागात गेलेली कामगार मंडळी नदीच्या एका बाजूस अडकली. संध्याकाळनंतर पाणी ओसरू लागले.

दुसऱ्या दिवशी पिण्याचे पाणी नाही, वीज नाही. त्यामुळे पुणेकरांचे हाल झाले. त्यावेळी मदतीसाठी सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते धावून आले. अनेक शाळा, मंगल कार्यालयांमध्ये पूरग्रस्तांना दोन-तीन आठवडे आसरा दिला. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. पुराने नव्या-जुन्या अनेक घरांना तडाखा बसला. संभाजी पुलाच्या फक्त कमानी शिल्लक राहिल्या होत्या. सगळीकडे दलदल आणि कुजलेल्या धान्याचा वास.

यातून पुण्याची घडी बसण्यास सहा महिने लागले. त्या वेळचे पंतप्रधान पंडित नेहरूंनी पुण्याला धावती भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. महाराष्ट्राच्या अनेक भागांतून मदतीचा ओघ येऊ लागला. पुण्याने फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली. देवाची एवढीच कृपा म्हणायची, की हा महाप्रलय रात्री न येता दिवसा येऊन गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com