पिंपरी-चिंचवडमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

शाळांमध्ये रंगीत तालीम 
प्रजासत्ताकच्या पूर्वदिनी शाळांमध्ये सगळीकडे कार्यक्रमांची रंगीत तालीम जोरदार सुरू होती. अनेक शाळांमध्ये सकाळीच गुलाबी थंडीमध्ये विद्यार्थी परेड करण्यात दंग होती. एनसीसी, आरएसपी, स्काउट-गाईडच्या विद्यार्थ्यांची कवायत मैदानावर पाहावयास मिळत आहे. काही शाळांमध्ये नृत्याचाही सराव सुरू होता. लेझीम, झांज पथकांची रंगीत तालीम घेण्यात आली. सर्वत्र रंगीत तालीम सुरू असल्याने शाळांच्या मैदानांवर ढोल व झांज पथकांचे आवाज घुमत होते. रंगीत पताका लावण्याची लगबग सुरू होती. शाळा, महाविद्यालये, विविध सरकारी कार्यालयांच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

पिंपरी - प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिका, पोलिस आयुक्तालयासह शहरातील शाळा व विविध संस्था-संघटनांच्या वतीने रविवारी (ता. २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. २५) विविध शाळांमध्ये संचलनाच्या सरावासह सांस्कृतिक कार्यक्रमांचा जोरदार सराव सुरू होता. विद्यार्थ्यांमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीसमोरील पटांगणात रविवारी सकाळी साडेसात वाजता ध्वजवंदनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाची आयुक्तालयात शनिवारी जोरदार तयारी सुरू होती. ध्वजस्तंभाला रंगरंगोटी करण्यासह परिसरातील स्वच्छता करण्यात आली. सलामी देण्यासाठी अधिकारी, कर्मचारी थांबण्याचे ठिकाण निश्‍चित करण्यासाठी इमारतीसमोरील पटांगणात फक्कीने आखणी करण्यात आली. यांसह सलामी देण्याचा सराव घेण्यात आला. अतिरिक्त आयुक्त अथवा उपायुक्त यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल. 

महापालिका भवनासमोर महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सकाळी पावणेआठ वाजता ध्वजवंदन होणार आहे. या वेळी राजकीय पदाधिकाऱ्यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत; तसेच लष्कर, पोलिस, अग्निशामक दल व सुरक्षा विभागाचे जवानही उपस्थित राहणार आहेत. लष्करी जवानांकडून राष्ट्र धून वाजविली जाईल. महापालिका भवनासह क्षेत्रीय कार्यालय व करसंकलन कार्यालय येथेही ध्वजवंदन केले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: republic day celebration in pimpri chinchwad