पुणे विद्यापीठात साकारणार 'रिसर्च अँड इनोव्हेशन पार्क'

संतोष शाळिग्राम
रविवार, 23 डिसेंबर 2018

पुणे : तुम्ही विद्यार्थी, शिक्षक वा तरुण असाल आणि तुमच्या डोक्‍यात उद्योग सुरू करण्यासाठी अभिनव आणि नावीन्यपूर्ण कल्पना असतील, तर त्या पुढे नेण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ "रिसर्च अँड इनोव्हेशन पार्क'ची उभारणी करणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते 15 जानेवारी रोजी त्याचे उद्‌घाटन होणार आहे. 

पुणे : तुम्ही विद्यार्थी, शिक्षक वा तरुण असाल आणि तुमच्या डोक्‍यात उद्योग सुरू करण्यासाठी अभिनव आणि नावीन्यपूर्ण कल्पना असतील, तर त्या पुढे नेण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ "रिसर्च अँड इनोव्हेशन पार्क'ची उभारणी करणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते 15 जानेवारी रोजी त्याचे उद्‌घाटन होणार आहे. 

केंद्र, राज्य आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्याने सुरू होणाऱ्या पार्कसाठी विद्यापीठ "ना नफा-ना तोटा' तत्त्वावर कंपनी स्थापन करणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून औद्योगिक संघटना, "एमटीडीसी'सारखे उद्योजकतेला पाठबळ देणारे राज्य सरकारचे विविध विभाग, कर्जपुरवठा करणाऱ्या संस्था एकत्र आणल्या जाणार आहेत. यात समन्वयाचे काम विद्यापीठाची कंपनी करेल. त्यासाठी स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नियामक मंडळ असणार आहे. 

उद्योगांनाही फायदा 

विद्यापीठातील क्‍लासरूम कॉम्प्लेक्‍सची 30 हजार चौरस फुटांची जागा या कंपनीसाठी निश्‍चित करण्यात आली आहे. छोट्या उद्योगांना स्वत:चे संशोधन आणि विकास (आर अँड डी) यंत्रणा उभारण्यात अडचणी येतात. त्यांना विद्यापीठ पायाभूत सुविधांबरोबर आवश्‍यक उपकरणेदेखील उपलब्ध करून देणार आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पना मूर्त रुपात आणण्यासाठी याचा उपयोग होईल. 

शंभर कोटींचा प्रकल्प 

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, ""कंपनीसाठी आवश्‍यक सुरवातीचे भाग भांडवल विद्यापीठाकडून दिले जाईल. राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा), महाराष्ट्र सरकार यांचेही आर्थिक योगदान यात असेल. ही रक्कम सुमारे 25 कोटी रुपये आहे. पुढील तीन वर्षांत या कंपनीची शंभर कोटी रुपये उलाढाल अपेक्षित आहे.'' 

विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे आणि उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे म्हणून शिक्षण आणि उद्योग क्षेत्र एकत्र येण्याची गरज असते. ते प्रत्यक्ष काम विद्यापीठ या पार्कद्वारे करणार आहे. यातून तरुण आणि उद्योग एकत्र आणले जातील. सुरवातीला आधुनिक वाहननिर्मिती, नवपदार्थ निर्मिती, पर्यावरण आणि पाणी या क्षेत्रांतील नावीन्यपूर्ण कल्पनांवर काम होईल. याद्वारे विद्यापीठच कंपनीद्वारे बाजारपेठेत उभे राहील. 

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

Web Title: Research and Innovation Park to be set up at Pune University