
केडगाव (पुणे) : अंटार्क्टिका संशोधन मोहिमेचे प्रमुख राहिलेले संशोधक विलास लक्ष्मण जोगदंड (वय ५२) यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथील रहिवासी होते. त्यांच्या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जोगदंड यांना चार दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यांची कोरोना चाचणी पॅाझिटिव्ह आली होती. त्यामुळे यांना औंध येथील कोवीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, रूग्णालयात उपचार घेत असताना काल रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. जोगदंड यांचे माध्यमिक शिक्षण दौंड तालुक्यातील वरवंडच्या गोपीनाथ विद्यालयात झाले होते. अत्यंत कठिण परिस्थितीत त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले होते.
रुग्णालयात त्यांना चांगली वैद्यकीय ट्रिटमेंट मिळाली. उपचाराबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही. निधनाच्या एक दिवस अगोदर त्यांनी मला बरे वाटत आहे. काही काळजी करू नका, असा संदेश मोबाईलवर पाठवला होता. मात्र, त्यांची तब्येत अचानक खालावत गेली. त्यामुळे उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही, असे विलास जोगदंड यांच्या पत्नी सविता जोगदंड यांनी सांगितले.
खडकवासला धरणक्षेत्रात पावसाची विश्रांती
त्यांचा भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयातर्फे आयोजित केलेल्या ३५ व्या अंटार्क्टिका संशोधन मोहिमेत समावेश होता. भारत सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील १२० वैज्ञानिकांचा यात सहभाग होता. या मोहिमेचे नेतृत्व जोगदंड यांनी केले होते. त्यांच्यामुळे या मोहिमेचे नेतृत्व प्रथमच मराठी वैज्ञानिकाकडे आले होते. अंटार्क्टिकावर भारताची 'मैत्री' व 'भारती' अशी दोन संशोधन केंद्रे आहेत. तेथे जोगदंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी नोव्हेंबर २०१५ ते मार्च २०१७ या कालावधीत हवामानातील बदलांबाबत संशोधन केले होते. जोगदंड यांचा अंटार्क्टिका मोहिमेवर जाणाऱ्या ३२ व्या तुकडीत समावेश होता. या तुकडीत त्यांनी उत्कृष्ठ काम केले. त्यामुळे त्यांची ३५ व्या मोहिमेच्या प्रमुखपदी सन २०१५ मध्ये निवड झाली होती. जोगदंड यांनी अंटार्क्टिकावर उणे २० ते ३० डिग्री तापमानात संशोधनाचे काम केले. येत्या डिसेंबरमध्ये अंटार्क्टिकावर जाणाऱ्या मोहिमेचे ते पुन्हा नेतृत्व करणार होते. ते अंटार्क्टिका येथून दै. सकाळसाठी बातम्या व फोटो पाठवत असत.
जोगदंड यांच्या निधनाबद्दल आमदार राहुल कुल म्हणाले की, विलास जोगदंड हे दौंड तालुक्याचा अभिमान होते. त्यांनी अंटार्क्टिका येथे अत्यंत प्रतिकुल हवामानात यशस्वी संशोधन केले होते. त्यांचे आकस्मिक जाणे हे धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंब, तालुका व हवामान खात्याची मोठी हानी झाली आहे. शाररिक दृष्ट्या ते सक्षम होते, हे त्यांच्या अंटार्क्टिका मोहिमांवरून लक्षात येते. मात्र, कोरोनाची लढाई त्यांना जिंकता आली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.