पुणे विद्यापीठातील संशोधकांनी उलगडले मानवी जिनोमचे गूढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांकडून मानवी जिनोमचे गूढ उलघडणारे मूलभूत संशोधन
- आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधकांकडून अधिमान्यता
- एड्स, कर्करोगांवरील उपचारांसाठी उपयुक्त ठरणार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर संशोधन संस्थांमधील संशोधकांच्या गटाने मानवी जिनोमच्या त्रीमितीय रचनेमध्ये कार्यरत असणाऱ्या महत्वाच्या अशा ‘स्कॅफोल्ड् / मॅट्रीक्स अटॅचमेंट रिजन्स'चा (स्मार) संपूर्ण आराखडा तयार करण्यात यश मिळवले आहे. त्याचबरोबर मानवी जिनोमशी, एड्स, कर्करोग यासारख्या गंभीर व्याधींना कारणीभूत ठरणाऱ्या 'रेट्रोव्हायरस' कुळातील विषाणूच्या संसर्गाचा असलेला नेमका संबंध शोधून काढण्याची कामगिरीही केली आहे. अशा प्रकारचा संबंध जगात पहिल्यांदाच शोधण्यात आला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवमाहितीशास्त्र विभागातील डॉ. अभिजीत कुलकर्णी, जैवतंत्रज्ञान विभागातील डॉ. स्मृती मित्तल, पुण्यातील राष्ट्रीय कोषिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस) व कोलकाता येथील भारतीय रासायनिक जीवविज्ञान संस्थेचे (आयआयसीबी) डॉ. समित चट्टोपाध्याय यांच्यासह विद्यार्थी संशोधक नितीन नरवडे, सोनल पटेल व आफताब आलम यांच्या गटाने हे संशोधन केले आहे. याबाबतचा संशोधन प्रबंध अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या “न्युक्लिक अॅसिडस् रीसर्च जर्नल”मध्ये जून २०१९ च्या अंकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन समुदायाचीही अधिमान्यता मिळाली आहे.

नेमके संशोधन काय?
हे संशोधन गेल्या चार वर्षांपासून सुरू होते. त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात संशोधकांनी ‘बायोलॉजिकल डेटा मायनींग’ करत म्हणजेच उपलब्ध असलेल्या नोंदी मिळवून उपयोग करून संपूर्ण मानवी जिनोममधील महत्वाचा घटक असलेल्या ‘स्मार’चा आराखडा तयार केला. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये एचआयव्ही (एड्ससाठी कारणीभूत ठरणारा) व एचटीएलव्ही (कर्करोगासाठी करणीभूत ठरणारा) यासारख्या विषाणूंची लागण असणाऱ्या १२ लाख नमुन्यांचा अभ्यास केला आहे. संशोधकांनी या नमुन्यांचे विश्लेषण करताना हा विषाणू आणि मानवी डीएनएच्या एकत्रिकरणाच्या प्रक्रियेचा संबंध बारकाईने अभ्यासला. त्याद्वारे हे घातक विषाणू मानवी ‘स्मार’ आणि त्यांच्या त्रिमितीय संरचनेत कसे व कुठे प्रवेश करतात याचा उलगडा केला. त्यामुळे आता या विषाणूंच्या माणसाच्या डीएनए मधील शिरकावाबद्दल महत्वाची माहिती पहिल्यांदाच जगापुढे आली आहे.

संशोधनाचा उपयोग काय?
- हे संशोधन एड्ससारख्या विषाणूजन्य आजारावरील तसेच, विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांवरील उपचार शोधण्यासाठी उपयुक्त ठरेल.
- मानवी जिनोमची कार्यपध्दती समजून घेण्यासाठीही त्याचा उपयोग होणार आहे.
- भविष्यात जीवशास्त्रामधील अनेक क्लिष्ठ प्रश्न सोडविण्यासाठी जैवमाहितीशास्त्र उपयुक्त ठरत आहे व ते पुढेही अधिक उपयुक्त ठरेल, अशी माहिती या टीममधील संशोधक डॉ. अभिजित कुलकर्णी यांनी दिली.

- 'न्युक्लिक अॅसिडस रीसर्च जर्नल'चे महत्व
हे संशोधन ‘न्युक्लिक अॅसिडस रिसर्च जर्नल’ मध्ये प्रसिद्ध झाले आहे. ते विज्ञान संशोधनासाठीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील अतिशय महत्वाचे जर्नल मानले जाते. त्याचा ‘इम्पॅक्ट फॅक्टर’ ११.१५ इतका आहे. यावरून या संशोधनाचे महत्व स्पष्ट होते.
.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Researchers at the University of Pune have uncovered the mystery of the human genome