जुन्नर : मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका - अजित पवार

पवार यांनी बोलण्यास सुरवात करताच योगेश केदार या युवकाने मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करताना आम्ही आत्महत्या करायची का? असा प्रश्न केला.
 Deputy Chief Minister Ajit Pawar
Deputy Chief Minister Ajit PawarSAKAL

जुन्नर/ओझर : मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किल्ले शिवनेरी येथे सांगितले. शिवजन्म सोहळ्यानंतर शिवकुंज येथे मराठा सेवा संघाने आयोजित केलेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे,राज्य मंत्री आदिती तटकरे,आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डुबल ,माजी तालुकाध्यक्ष एड.राजेंद्र बुट्टे पाटील तसेच शिवभक्त उपस्थित होते.

पवार यांनी बोलण्यास सुरवात करताच योगेश केदार या युवकाने मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करताना आम्ही आत्महत्या करायची का? असा प्रश्न केला. त्यास उत्तर देताना पवार म्हणाले, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कायद्यात बदल करून आरक्षणाची मर्यादा वाढविण्या बाबत विनंती केली आहे. वाढीव आरक्षणा बाबतचा कायदा मंजूर व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. असे पवार यांनी स्पष्ट केले.

घटनात्मक तरतुदीमुळे आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यापेक्षा अधिक वाढविता येत नसल्याने यातून मार्ग काढण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही मराठ्याच्या पोटचेच आहोत जातीचा अभिमान आम्हाला देखील आहे त्यामुळे हा विषय भावनात्मक करू नये. कोणतेही राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला यातून मार्ग काढायचा आहे असे पवार म्हणाले.

छत्रपती शिवरायांच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी यासाठी गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासनाची भूमिका असून यासाठी पुरातत्व, पर्यावरण, वन विभाग आदी विभागांच्या माध्यमातून जुन्या बांधकाम रचनेला धक्का न लावता या वारसास्थळांचे जतन करण्यात येईल. शिवनेरी संवर्धनासाठी २३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यातून किल्ल्याच्या परिसरात विकास कामे सुरू आहेत.

शिवछत्रपतींनी जतन केलेल्या जुन्नरच्या हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळावे अशी मागणी आमदार अतुल बेनके यांनी यावेळी केली यावेळी दुर्गसंवर्धक विनायक खोत यांना शिवनेरी भूषण व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्व. डॉ. अनिल अवचट यांना मरणोत्तर छत्रपती शिवाजी पुरस्कार देऊन स्मानित करण्यात आले. अवचट यांच्या कन्या मुक्ता पुणतांबेकर यांनी पुरस्काराचा स्वीकार केला. टपाल खात्याच्या जुन्नरची रत्ने या सचित्र पोस्टकार्ड संचाचे अनावरण व पर्यटन विभागाचे गाईड प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. मराठा सेवा संघाच्या वतीने सायली कोंडे व निशा कोंडे यांनी जिजाऊ वंदना म्हटली. प्रास्ताविक विजय घोगरे यांनी केले. रूपेश जगताप यांनी सूत्रसंचलन केले. रघुवीर तुपे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com