esakal | ओबीसी समाजाला आरक्षण द्यावे, त्यानंतर निवडणुका घ्याव्यात- हर्षवर्धन पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

harshawadhan patil

ओबीसी समाजाला द्यावे, त्यानंतरच निवडणुका घ्याव्यात- पाटील

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर: महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या अनैसर्गिक तीन पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण घालवून त्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे या समाजास कायद्यात बसणारे आरक्षण प्रथम द्यावे, नंतर निवडणुका घ्याव्यात ही आमची मागणी आहे. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सहकार मंत्री तथा भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिला.

हेही वाचा: ठाकरे सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला- पडळकर

ओबीसी समाजास आरक्षण द्यावे या मागणीसाठी हर्षवर्धन पाटील तसेच भाजप जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तहसील कार्यालय प्रांगणात आंदोलन तर महाविकास आघाडी सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी सक्षम वकिल दिला नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे म्हणणे आहे. आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जेष्ठ मार्गदर्शक शरद पवार यांनी यासंदर्भात जाहीर खुलासा करणे गरजेचे आहे.

गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचाली केल्या नाहीत.

इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम म्हणून ओबीसी आरक्षणाशिवाय ५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद निवडणूका ओबीसी समाजाला आरक्षण न देता घ्यायच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही.

यामागे ओबीसी समाजाला मुख्य विकास प्रवाहात येऊ द्यायचे नाही असा सत्ताधाऱ्यांचा डाव दिसत आहे. यापूर्वी राज्यात ७ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या असून त्यामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. मात्र त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे.

यावेळी अॅड. कृष्णाजी यादव, अॅड. शरद जामदार, मारूतराव वणवे, माऊली चवरे, तानाजी थोरात, गजानन वाकसे, शकीलभाई सय्यद, धनंजय पाटील, कैलास कदम, पांडुरंग शिंदे, गोरख शिंदे, राम आसबे, माऊली वाघमोडे, प्रेमकुमार जगताप, तेजस देवकाते, सुयोग सावंत, शीतल साबळे हे मान्यवर उपस्थित होते.

loading image
go to top