आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांची मोहीम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

कधी या जातीला, तर कधी त्या जातीला आरक्षणाची खिरापत वाटत वैद्यकीय शिक्षणाचा सरकारने खेळखंडोबा केल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यामुळे उद्याच्या डॉक्‍टरांनी आजच एकत्र येत आरक्षणाच्या विरोधात #MurderofMerit राज्यभर मोहीम उघडली आहे.

पुणे - कधी या जातीला, तर कधी त्या जातीला आरक्षणाची खिरापत वाटत वैद्यकीय शिक्षणाचा सरकारने खेळखंडोबा केल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यामुळे उद्याच्या डॉक्‍टरांनी आजच एकत्र येत आरक्षणाच्या विरोधात #MurderofMerit राज्यभर मोहीम उघडली आहे. यात राज्यातील वेगवेगळ्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थी एकत्र येऊन ‘कॅंडल मार्च’ काढत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातही उद्या (ता. १०) संध्याकाळी सहा वाजता ‘कॅंडल मार्च’ काढला जाणार आहे. 

आरक्षणाच्या मुद्यावरून देशभरातील वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण तयार होत आहे. हा नाराजीचा सूर सरकारपर्यंत पोचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘कॅंडल मार्च’चा मार्ग अवलंबला आहे. यात सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणणे सरकारपर्यंत पोचविण्यासाठी ट्‌विटरवर #MurderofMerit हॅशटॅगवर नवीन मोहीम उघडण्यात आली आहे. देशभरात खासगी वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्‍टरांचाही याला पाठिंबा मिळतोय. एकच महाविद्यालय, एकच पुस्तक, एकच शिक्षक, एकच लेक्‍चर इतकेच काय, पण परीक्षाही एकच! शिक्षण समान आहे, तर मग संधी का असमान, असा सवाल हे विद्यार्थी सरकारला करीत आहेत. त्यामुळे या सरकारने गुणवत्तेची हत्या केल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहेत. 

वैद्यकीयसाठी खुल्या प्रवर्गातील जवळपास दोन हजार पात्र विद्यार्थी असतात. पण, त्यापैकी जेमतेम २३३ विद्यार्थ्यांना सध्या वैद्यकशाखेत प्रवेश मिळतोय. राज्यात ७८ टक्के जागा आरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे. फक्त २३३ जागा फक्त खुल्या प्रवर्गासाठी मिळणार असतील, तर आम्ही डॉक्‍टर व्हायचे की नाही? या प्रश्‍नावर आता या विद्यार्थ्यांना सरकारकडून उत्तर हवे आहे.

विद्यार्थी त्यांची तहान, भूक हरपून, पूर्ण जिद्दीने अभ्यास करतात. चांगले गुणदेखील मिळवतात. असे असूनही प्राण पणाला लावून केलेल्या अभ्यासाचे व कष्टाचे फळ मिळत नाही. 
- वरद सप्तर्षी, रंगुनवाला दंतवैद्यकीय महाविद्यालय

देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, प्रत्येकाच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर सहभागी व्हा. कारण, हा फक्त एका विद्यार्थ्याचा प्रश्‍न नाही, तर डॉक्‍टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाचा आहे. 
- शालवी कामत, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

आवडत्या विषयात काम करायला मिळावे म्हणून आम्ही झटतो आणि शेवटी गुणवत्ता असूनही आमच्या आकांक्षा चिरडल्या जातात. याविरोधात आता ‘मर्डर ऑफ मेरिट’ आहे. 
- डॉ. ऋतुजा पुरंदरे, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reservation Student Campaign