
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमडी, एमएस अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत, महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये कोरोना वॉर्डात ड्युटी बजावणाऱ्या निवासी डॉक्टरांना स्टायपेंड वाढ करण्यात आलेली नसल्याने ते नाराज झाले आहेत.
कोरोना काळातच खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर झाले नाराज, कारण...
पुणे : खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमडी, एमएस अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत, महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये कोरोना वॉर्डात ड्युटी बजावणाऱ्या निवासी डॉक्टरांना स्टायपेंड वाढ करण्यात आलेली नसल्याने ते नाराज झाले आहेत.
हे वाचा - पुण्याचा चिराग फलोर "जेईई'मध्ये देशात बारावा; दिल्ली एनसीटीमध्ये प्रथम
कोरोनाच्या प्रादुर्भावात खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमएस, एमडी अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, संलग्न रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. मात्र, राज्य सरकारने केवळ सरकारी महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचे स्टायपेंड वाढविले असून, खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या डॉक्टरांमध्ये असंतोष आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने स्टायपेंडवाढीचा निर्णय त्वरित घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत सरकारी महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना दरमहा १० हजार रुपये स्टायपेंड वाढीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने या निवासी डॉक्टरांना मे महिन्यापासून १० हजार रुपये वाढीव वेतन देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, या निर्णयात खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना वगळण्यात आले असून, त्यांचा उल्लेख टाळला आहे. त्यामुळे त्यांच्यावर एकप्रकारे अन्याय झाला आहे.
राज्य सरकारने सरकारी आणि खासगी डॉक्टर यांच्यामध्ये स्टायपेंड वाढीतून भेदभाव करण्याचा प्रकार केल्याची भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे. राज्यातील निवासी डॉक्टर हे आपला जीव धोक्यात घालून कोरोना वॉर्डात संसर्गाची सामना करीत आहेत; तसेच संशयित रुग्णांची सेवा करीत आहे. कोरोनाची रुग्णसंसख्या अधिक असणाऱ्या ठिकाणी ही रुग्णसेवा २४ बाय ७ होत असल्याचे चित्र आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढाईत जीवाची परवा न करता रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमइआर) संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सरकारी महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांप्रमाणे खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टराचे स्टायपेंड १० हजारांनी वाढवण्याची मागणी निवासी डॉक्टरांनी केली आहे.
(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
Web Title: Resident Doctor Stipend Increase Private Doctors Waiting
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..