esakal | परदेशवारीच्या महत्त्वकांक्षेला निर्बंधांचे ‘बंध’
sakal

बोलून बातमी शोधा

flight

परदेशवारीच्या महत्त्वकांक्षेला निर्बंधांचे ‘बंध’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-- लेखादिव्येश्वरी चंद्रात्रे

पुणे : शिक्षण, नोकरी, व्यवसाय, तातडीचे काम आदी कारणांमुळे परदेशात जाण्यासाठी अनेक प्रकारचे निर्बंध आल्याने युवकांची परवड होत आहे. त्यातून काहीजणांचे परदेशातील करिअरचे स्वप्न साकार करण्यात अडथळे येत आहेत. त्याचप्रमाणे तातडीच्या कारणासाठीही परदेशात जाणाऱ्यांना अनेक अग्निदिव्ये पार करावी लागत आहेत. (Restrictions on foreign ambitions)

परदेश प्रवास हा आता चैनीचा राहिलेला तर, गरजेचाही झाला आहे. परंतु अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, दुबई आदी विविध देशांचे निर्बंध विविध प्रकारचे आहेत. तसेच विमान कंपन्यांचेही नियम वेगवेगळे आहेत. त्यामुळे परदेशात जाणारे प्रवासी धास्तावले आहेत. प्रवासादरम्यान कोठे अडकून पडणार नाही ना, अशी भीती त्यांना वाटत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता अनेक देशांत वर्तविण्यात येत आहे. त्यामुळेही नवीन निर्बंध लागू होत आहेत.

देशातील अनेक विद्यार्थी परदेशात उच्चशिक्षण घेत आहेत तर, काहीजण तेथे स्थायिकही झाले आहेत. त्यांना दरवर्षी एकदा तरी देशात यायचे असते. परंतु, निर्बंधांमुळे गेल्या दीड वर्षांत अनेकांना घरी येता आले नाही. ज्यांनी देशात येण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही अनेक निर्बंधांचा सामना करीत यावे लागले. या कालावधीत अनेक विमानांच्या फेऱ्या अचानक रद्द झाल्या. परिणामी, संबंधित प्रवाशांचे आर्थिक नुकसानही झाले.

अमेरिकेत जाण्यासाठी सध्या विद्यार्थ्यांनाच व्हिसा मिळत आहेत. मात्र, त्यासाठी कोटा कमी असल्याने वेटिंग लिस्ट वाढली आहे. युरोपमध्ये जाताना अनेक निर्बंध आहेत. तातडीचे कारण असेल तर, त्याचे महत्त्व पटल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. स्विर्झलॅंडमध्ये लसीचे दोन डोस घेतले असेल तरच प्रवेश दिला जातो, असे काही विमान वाहतूक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

यासंदर्भात बोलताना देवांग टुर्स अँड ट्रॅव्हल्सचे नीलेश भन्साळी म्हणाले, "आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियोजन करणे आमच्यासाठी देखील आव्हानात्मक झाले आहे. कारण, सतत नियम बदलत आहेत. तसेच बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या संकेतस्थळांवर पुरेशी माहिती व नियमावली नसते, त्यामुळेही गोंधळ उडतो. आमच्याकडे येणाऱ्या प्रवाशांना वेगवेगळ्या देशांत जायचे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी वेगवेगळा अभ्यास व नियोजन करावे लागते. एकाच ठिकाणी सर्व नियम व माहिती स्पष्टपणे, सहजपणे आणि प्रवाशांना समजेल अशा पद्धतीने उपलब्ध करून देण्याची गरज आहे."

प्रवाशांना आलेले अनुभव....

  1. जर्मनीच्या विमानतळावर डिजिटल रिपोर्ट तपासला जाणार नाही, असे अचानक सांगण्यात आले. त्यांना प्रिंटआऊटसच हव्या होत्या. त्यामुळे १० ते २० युरो खर्च करून रिपोर्टच्या प्रिंटआऊट काढाव्या लागल्या. हा खर्च जास्त होता, असा अनुभव एका विद्यार्थ्याने सांगितला.

  2. अमेरिकेतील उटाह शहरात एक युवक नोकरी करतो. त्याला भारतात येणे शक्य आहे. परंतु, व्हिसाच्या निर्बंधांमुळे परत जाण्यासाठी फेब्रुवारीनंतर संधी मिळेल, असे अमेरिकन सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याने भारतात येण्याचा बेत तूर्त रद्द केला आहे.

  3. आई- वडील अमेरिकेत नातेवाइकांकडे गेले. तेथे वडिलांचा मृत्यू झाला. परंतु, निर्बंधांमुळे त्यांच्या मुलीला तेथे जाण्यासाठी टुरिस्ट व्हिसा वेळेत मिळाला नाही. त्यामुळे तिला तेथे जाता आले नाही.

आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी अडचणी

  • अनेक देशांतील विमान प्रवासासाठीच्या नियमांची एकत्रित माहिती उपलब्ध नसणे.

  • कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांना परदेशात जाणे अवघड.

  • भारतातून आलेल्या प्रवाशांना ब्रिटनमध्ये प्रवेश नाही.

  • कॅनडा, नेदरलँड, बांगलादेश, टांझानिया, जर्मनी, केनिया, बहारीन, पाकिस्तानला जाण्यासाठी नियमित विमान सेवा नाही.

  • वैद्यकीय कारणासाठी अमेरिका व्हिसा देते. मात्र, टुरिस्ट व्हिसाला स्थगिती.

loading image