नाटा परीक्षा सुरळीत पार; परीक्षेचा निकाल येत्या बुधवारी 

नाटा परीक्षा सुरळीत पार; परीक्षेचा निकाल येत्या बुधवारी 

पुणे : आर्किटेक्चरच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘नॅशनल ॲप्टीट्युट टेस्ट इन आर्किटक्चर’ (नाटा) परीक्षा शनिवारी सुरळीत पार पडली. राज्यात असलेल्या विकेंड लॉकडाऊनमुळे ही परीक्षा होणार का, परीक्षेला जाता येणार का, असे असंख्य प्रश्न परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मनात होते. परंतु हॉल तिकिट जवळ बाळगल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोचण्यात अडचणी आल्या नसल्याचे दिसून आले. तसेच परीक्षेचा पेपरही चांगला होता, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या परीक्षेचा निकाल येत्या बुधवारी (ता.१४) जाहीर होणार आहे.

आर्किटेक्चरमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने घेण्यात येणारी ‘नाटा’ परीक्षा देणे अनिवार्य आहे. ही परीक्षा वर्षांतून दोनदा घेतली जाते. विद्यार्थी त्यापैकी कोणत्याही एका परीक्षेला किंवा दोन्ही परीक्षांना बसू शकतो. दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जास्त गुण मिळवलेली परीक्षा प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येते. यंदा ही परीक्षा शनिवारी झाली, तर दुसरी परीक्षा १२ जूनला होणार आहे. जूनमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ३० मेपर्यंत अर्ज करता येणार आहे. 

एकूण १२५ प्रश्न आणि दोनशे गुणांची ही परीक्षा तीन तासांची होती. कॉम्प्युटरद्वारे ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. देशातील १५८ शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. तर राज्यात पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये परीक्षा केंद्र होते. यंदा पिंपरी-चिंचवडमध्येही परीक्षा केंद्र देण्यात आल्याने परीक्षेसाठी पुण्यातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची होणारी गर्दी विभागली गेली. दरवर्षी प्रत्यक्ष होणारा ड्रॉईंगचा पेपर यंदा झाला नाही, त्याएवजी पेपरमधील ‘सेक्शन बी’मध्ये ड्रॉईंगशी संबंधित संकल्पनांवर आधारित काहीसे अवघड प्रश्न विचारण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये परीक्षा केंद्र असल्यामुळे पुण्यात जाऊन परीक्षा देण्याचा त्रास वाचला. गणित, भौतिकशास्त्र, सामान्य ज्ञान, आकृत्यांवर आधारित प्रश्न होते. ‘सेक्शन-बी’मध्ये यंदा ड्रॉईंगचा पेपर नव्हता. त्याएवजी त्याचधर्तीवर काहीसे बुद्धीला अधिक चालना देणारे प्रश्न विचारण्यात आले होते. -योगेश भंडारी, परीक्षार्थी

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com