
ऑफलाईन परीक्षेचा निकाल वेळेत लागणार का?
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या सत्रातील सर्व परीक्षा नेहमीच्या म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने घेणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र ऑफलाईन परीक्षेसाठी लागणारा कालावधी हा ऑनलाइन परीक्षे पेक्षा जास्त असून, उशिरा लागणारे निकाल पुढील प्रवेशासाठी अडचण निर्माण करतील, अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठाप्रमाणेच या सत्राची परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लेखी परीक्षा या ऑनलाइन स्वरूपात घेण्यात येणार आहेत. त्याचवेळी, प्रात्यक्षिक परीक्षा या ऑफलाईन स्वरूपात होतील. विद्यापीठाच्या शिक्षण मंडळात हा निर्णय गुरुवारी (ता.२१) घेण्यात आला होता. या निर्णयाचे पडसाद राज्यभरातील विद्यापीठांवर पडले आहे. सावन मेहता म्हणतो, ‘‘आतापर्यंत आमचे एक युनिट शिकवून झाले आहे. लेखी परीक्षा तीन युनिटची होणार आहे. त्यानंतर प्रात्यक्षिक आणि इतर अहवालांची पुर्तता करावी लागणार आहे. प्रकल्पांचे कामही चालू आहे. ही प्रक्रिया खुपवेळ खाऊ आहे. जर ऑनलाइन परीक्षा घेतली तर वेळ वाचेल आणि आम्हाला पुढील प्रवेश परीक्षांनाही वेळ मिळेल.’’
विद्यार्थ्यांच्या अडचणी पाहता नागपूर विद्यापीठाप्रमाणे राज्यातील विद्यापीठांनी एका सत्रा पुरता असा शहाणा निर्णय घेतला पाहिजे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तर साडेसहा लाख विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा वेळेत कशी घेणार हा प्रश्न आहे.
- अविनाश मारे, विद्यार्थी
ऑफलाईन परीक्षांचा निकाल वेळेत लावण्याचे मोठे आव्हान पुणे विद्यापीठासमोर आहे. कारण आम्हाला जून महिन्यात कंपनीमध्ये निकाल द्यायचा आहे.
- रोहीत शितोळे, विद्यार्थी
मार्च महिन्यापर्यंत हिवाळी परीक्षा चालू होत्या. तीन महिने उशिराने परीक्षा सुरू झाल्यात. आता लगेच उन्हाळी परीक्षा होणार आहे. त्यामुळे आमच्या अडचणी अधिकच वाढल्या आहे. विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षांद्वारे दिलासा द्यायला हवा.
- सौरभ पाटकुळे, विद्यार्थी
हिवाळी सत्रातील परीक्षा उशिरा झाल्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांवर ताण आला आहे. मात्र ऑनलाइन परीक्षेने हा प्रश्न सुटणार नाही. ऑफलाइन परीक्षा वेळेत पार पडण्यासाठी विद्यापीठाने नियोजन केले आहे. विद्यापीठाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांचे दीर्घकालीन हीत लक्षात घेता नेहमीच्या पद्धतीनेच परीक्षा घेणे गरजेचे आहे.
- प्रा. मगन ताटे, माजी अधिसभा सदस्य
तुम्हाला काय वाटते?
कोरोनानंतर प्रथमच परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक मतप्रवाह आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा नक्की कशी घ्यावी, काय आहे तुमचे मत? कळवा पुढील व्हॉट्सअप क्रमांकावर...८४८४९७३६०२
Web Title: Results Offline Exam Available Time Student Questions Demand Decision Making Nagpur University Online Examination Pune University
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..