पुन्हा गाठी ऋणानुबंधाच्या; 4 मुलींच्या भविष्यासाठी 8 वर्षांनी थाटला संसार

सनील गाडेकर
Thursday, 7 January 2021

वैचारिक वाद, संशयवृत्ती, विवाह बाह्य संबंध किंवा इतर अनेक कारणांमुळे नवरा-बायको वेगळे राहायला सुरवात करतात व कालांतराने घटस्फोट घेतात. वाद झाले म्हणजे आता पुन्हा आपला संसार जुळणारच नाही, असा समज निर्माण करणाऱ्यांना तन्वी व सुरेश यांचे एकत्र येणे प्रेरणादायी ठरणार आहे.

पुणे : आता आपलं काय पटणार नाही. त्यामुळे आपण वेगळेच राहू या विचारातून तन्वी व सुरेश स्वतंत्र राहायला लागले. त्यांच्या चारही मुली तन्वी यांच्याकडे होत्या. या काळात दोघेही मुलींच्या भविष्याबाबत चिंतित होते. त्यामुळे आपसांतील मतभेद दूर ठेवत ते तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत.

वैचारिक वाद, संशयवृत्ती, विवाह बाह्य संबंध किंवा इतर अनेक कारणांमुळे नवरा-बायको वेगळे राहायला सुरवात करतात व कालांतराने घटस्फोट घेतात. वाद झाले म्हणजे आता पुन्हा आपला संसार जुळणारच नाही, असा समज निर्माण करणाऱ्यांना तन्वी व सुरेश यांचे एकत्र येणे प्रेरणादायी ठरणार आहे. दोघांचाही 26 नोव्हेंबर 2003 रोजी विवाह झाला होता. प्रपंचाची सुरवात झाल्यानंतर त्यांना चार मुली झाल्या. दरम्यान 2012 पासून मतभेद आणि गैरसमजातून त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यामुळे तन्वी या चारही मुलींसह त्यांच्या माहेरी राहू लागल्या.

लातूरकडे धान्य घेऊन निघालेल्या ट्रक चालकाचा अज्ञाताकडून खून 

पतीपासून दूर गेल्यानंतर त्यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या कायद्यान्वये सुरेश यांच्या विरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल करून पोटगीची मागणी केली. मुलींच्या संभाळासाठी पत्नीला दरमहा चार हजार रुपये पोटगी द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याप्रमाणे सुरेश पोटगीची रक्कम पत्नी व लहान मुलींना देत होते. मात्र गेल्या आठ वर्षांच्या काळात त्यांच्यातील वाद हळूहळू कमी होत गेले. चारही मुलींच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून दोघांनी पुन्हा एकत्र राहून संसार करण्याचे ठरविले. ते दोघेही पुन्हा एकत्र यावे यासाठी ऍड. एकनाथ सुगावकर यांनी प्रयत्न केले. ऍड. सुगावकर हे सुरेश यांची बाजू न्यायालयात मांडत होते.

नवीन वर्षांत घेतली एकत्र राहण्याची शपथ 
दोघांमधील मतभेद व गैरसमज आता पूर्णपणे मिटले असून ते चारही लहान मुलींसह एकत्र राहत आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांच्या पुढे 1 जानेवारी रोजी दोघेही हजर झाले. आम्ही भविष्यात एकत्र राहणार आहोत व मुलीच्या भवितव्याचा विचार करणार आहोत. त्यामुळे पत्नीने दाखल केलेले प्रकरण पुढे चालवायचे नाही, असे न्यायालयास सांगितले. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा अर्ज निकाली काढला.

''कोणाचे काय चुकले व कोण किती बरोबर आहे, यावर वाद घालत बसण्यापेक्षा मुलींचा विचार करा, हे मी त्यांना वेळोवेळी पटवून दिले. त्यांनी पुन्हा एकत्र यावे यासाठी त्यांचे दोन वर्षांहून अधिक काळ समुपदेशन केले. आता त्यांची मोठी मुलगी लग्नाला आली आहे. या सर्व बाबींचा विचार करून त्यांचे मतपरिवर्तन झाले.''
- अॅड. एकनाथ सुगावकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reunion after eight years for the future of four girls