इंजिनिअर तरुणीला रानफुलांची वनस्पतीशास्त्रीय ओळख वाढवायचा छंद 

नीला शर्मा 
शुक्रवार, 29 मे 2020

रेवती गिंडी या इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर तरुणीला रानफुलांचे रंग, रूप, आकार मोहू लागल्यावर त्यांचे प्रकार व प्रदेशनिष्ठ प्रजातींच्या तऱ्हा, यांबद्दल खोलात जाऊन माहिती घेण्याचा छंद जडला.

रेवती गिंडी या इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर तरुणीला रानफुलांच्या ओढीने निसर्गात भटकंती करायचा छंद जडला. तो इतका वाढला की, ही "जानपहचान' अधिक गहिरी व्हावी, यासाठी तिने संबंधित विद्याशाखांचे निरनिराळे अभ्यासक्रम पूर्ण केले. निरीक्षण व चिंतनाची जोड देऊन तिने विशिष्ट भागातील रानफुलांचा तौलनिक अभ्यास केला. आज जैवविविधता क्षेत्रातील अनेक तरुणांना एखाद्या रानफुलाची अनोळखी प्रजाती दिसली, तर तिच्याबद्दल नेमकी माहिती विचारण्यासाठी हक्काची व्यक्ती म्हणजे रेवती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रेवती गिंडी या इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर तरुणीला रानफुलांचे रंग, रूप, आकार मोहू लागल्यावर त्यांचे प्रकार व प्रदेशनिष्ठ प्रजातींच्या तऱ्हा, यांबद्दल खोलात जाऊन माहिती घेण्याचा छंद जडला. त्या म्हणाल्या, ""याबद्दल आणखी जास्त कळावं म्हणून मी इकॉलॉजिकल सोसायटी, आघारकर इंस्टिट्यूट व निसर्ग सेवक यांसारख्या संस्थांचे अभ्यासक्रम पूर्ण केले. इकॉलॉजिकल सोसायटीच्या, पानशेत धरणक्षेत्रातील एका प्रकल्पात वनस्पतींबाबतचा तौलनिक अभ्यास करायची संधी मिळाली. यात तिथे आढळलेल्या वनस्पती ओळखून त्यांची नोंद करणं, अशा दस्तऐवजी मर्यादित कामापलिकडे नेणारा विस्तृत पट माझ्यासमोर उलगडला गेला. त्या वनस्पतींचा अधिवास, त्यात त्यांची होणारी वाढ व परिसराशी असलेलं त्यांचं नातं अशा अनेक गोष्टी अभ्यासता आल्या. काही दुर्मिळ वनस्पतींची नोंद करता आली.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रेवती यांनी असंही सांगितलं की, पश्‍चिम घाटातील वनस्पतींच्या संरक्षण- संवर्धन प्रकल्पांतर्गत पालघर जिल्ह्यात चाललेल्या एका कामात सहभागी होता आलं. हे करताना मला जव्हार परिसरातील कातकरी, वारली, ठाकर, महादेव कोळी आदी आदिवासींचं तिथल्या वनस्पतींशी असलेलं नातं जवळून बघायला मिळालं. रानातल्या वनस्पती ते औषध किंवा रोजच्या आहारात वापरत होते. त्याबरोबरच संबंधित वनस्पतींसंबंधातील लोकसमजुती, परंपराही पाहायला मिळाल्या. काही वनस्पतींच्या बिया गोळा करून, त्यांच्या बदल्यात इतर वस्तू घेण्याचा वस्तू विनिमय व्यवहार त्यांच्यात चालताना पाहिला. येथील अभ्यासाचा उपयोग नंतर संबंधित संस्थेने त्या आदिवासी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक आहाराविषयी जाणीवजागृती कार्यक्रमासाठी केला. निसर्ग जपण्यासाठी प्रत्येकाला फार लांबवर कुठे जायला जमेलच असं नाही. जायला हवंच असंही नाही. आपल्या घराच्या खिडकी किंवा अंगणातला निसर्गही आपण जपू आणि जोपासू शकतो. आपल्या वागण्यातील यासाठी आवश्‍यक असलेले बदलसुद्धा बरंच काही घडवायला मदत करू शकतात. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Revati Gindi hobby is to increase the botanical identity of flowers