इंदापूरमधील बेकायदा वाळूउपसा करणाऱ्यांना धक्का; महसूल, वनविभागाकडून कारवाई

डॉ. संदेश शहा
Wednesday, 21 October 2020

वनपरिक्षेत्र हद्दीत साठवलेली १ लाख ५६ हजार रुपये किंमतीची तीस ब्रास वाळू जप्त करून वाळू साठवणूकीचे खड्डे व पाईप उध्वस्त केले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनीदिली.

इंदापूर : वनखात्याच्या जमिनीवरील अतिक्रमणे प्रभावी रितीने हटविल्यानंतर इंदापूर वनखात्याने पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील बेकायदा वाळू उपसा व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी कडक कारवाई सुरू केल्याने वाळू माफियांना चाप बसला आहे. वनपरिक्षेत्र हद्दीत साठवलेली १ लाख ५६ हजार रुपये किंमतीची तीस ब्रास वाळू जप्त करून वाळू साठवणूकीचे खड्डे व पाईप उध्वस्त केले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

काळे पुढे म्हणाले, ''उजनी जलाशय व पाणलोट क्षेत्रातील वाळू बेकायदेशीर रित्या काढुन ती साठवण्यासाठी जलाशयाजवळ असणा-या वनपरिक्षेत्राच्या जमिनीचा वापर केला जात होता. खड्डे करुन त्यात वाळूचा साठा केला जात होता. तेथून लोखंडीकिंवा नेहेमीच्या पाईपांद्वारे वाळू उपसली जाते अशी माहिती मिळाल्यानंतर आपण व सहकारी इंदापूरचे वनपाल संतोष बिटे, शेळगावचे वनपाल गणेश बागडे, भिगवणचे वनपाल अजय घावटे, पळसदेवचे वनरक्षक सनी कांबळे, विठ्ठल खारतोडे आदिंनी पाणलोट क्षेत्रात भिगवण ते कांदलगावपर्यंत वनजमिनींची कसून पाहणी करून गस्त सुरू केली. गस्तीमध्ये कांदलगाव, सुगाव, भिगवण, मदनवाडी, तक्रारवाडी हद्दीत वनक्षेत्राच्या जमिनीवर अवैध वाळूसाठे व वाळू काढण्याचे पाईप आढळून आले. त्यानंतर राहुल पाटील यांच्यामार्गदर्शना खाली ही कडक कारवाई करण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कांदलगाव वनविभागाच्या रोप वाटिकेजवळ फॉरेस्ट गट क्रमांक ३३ मध्ये २५ ब्रास तर सुगाव येथील फॉरेस्ट गट क्रमांक ६२ मध्ये ५ ब्रास वाळू आढळली.भिगवण, मदनवाडी, तक्रारवाडी या भागात वाळू साठवण्याचे खड्डे व वाळू काढण्यासाठी वापरात येणारे पाईप  नेस्तनाबूत करण्यात आले. वाळू वाहतुकीस अडथळे यावेत यासाठी वनहद्दीतील रस्ते खोदून टाकण्यात आले आहेत.

अवैध वाळू व्यवसायिक वेळप्रसंगी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन घालत असताना सापडलेल्या वाळुसाठ्याभोवती पहारा ठेवून ती वाळू वन परिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात आणण्याची जोखीम वनविभागाने पत्करली. या वाळूच्या लिलावासंदर्भात तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याशी चर्चा करून पुढे निर्णय घेण्यात येणार आहेत. गेल्या दहा महिन्यात अवैध वाळू व लाकूड वाहतूक करणारी १२ वाहने जप्त करण्यात आल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: revenue department takes action against illegal sand dredgers in Indapur