‘आरटीई’ प्रवेशांसाठी सुधारित यादी प्रसिद्ध

‘आरटीई’ प्रवेशांसाठी सुधारित यादी प्रसिद्ध

पुणे, ता. १५ : इंग्रजी माध्यमांतील शाळांच्या समावेशानंतर आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आरटीई पोर्टलवर जिल्हानिहाय सुधारित शाळांची संख्या आणि प्रवेश क्षमता प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये राज्यातील नऊ हजार १३८ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील एक लाख दोन हजार ४३४ जागांवर लवकरच प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. नवीन प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून (ता. १७) सुरू होणार आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे दरवर्षी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. मात्र राज्य शासनाने कायद्यात बदल केल्यामुळे केवळ मराठी माध्यमाच्या शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्याने प्रवेश दिला जात होता. विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसहाय्यीत शाळा असूनही या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली नव्हती. त्यामुळे शासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. राज्य शासनाच्या नऊ फेब्रुवारी २०२४च्या अधिसूचनेला न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे जुन्या पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला. सध्या आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्याची लिंक बंद आहे. मात्र पालकांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. पालकांकडून सरकारी शाळांच्या प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळाला. आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याने अर्जाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

‘‘विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी नोंदणी करण्याकरिता नवीन प्रक्रिया शुक्रवारपासून (ता. १७) ऑनलाइन पद्धतीने सुरू होईल. यापूर्वी ज्यांनी २५ टक्के राखीव जागांसाठी नोंदणी केली होती, त्यांना पुन्हा नोंदणी करणे आवश्यक राहील, याची पालकांनी नोंद घ्यावी.’’
- शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com