ॲड. रियाज पठाण खून खटला

ॲड. रियाज पठाण खून खटला
Published on

सात जणांना मरेपर्यंत जन्मठेप
ॲड. रियाज पठाण खून खटला

अहिल्यानगर, ता. २८ ः नेवासे तालुक्यातील ॲड. रियाज पठाण यांची हत्या करण्यात आली होती. या खटल्यात प्रवीण पोपट खरचंद, मोहन सुरेश लष्करे (फरार), रामेश्वर भगवान गाढे, चौरंगीनाथ गोरक्षनाथ लष्करे, पवन सोमनाथ नरुल्ला, सचिन चंदू चव्हाण, सादिक बशीर शेख या सात जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी ठोठावली. सबळ पुराव्याअभावी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
नेवासे तालुक्यातील वाळूतस्कर अण्णा लष्करे हा कुटुंबीयांसह छत्रपती संभाजीनगरला जात होता. त्यांची छत्रपती संभाजीनगर शहराजवळ टोळी युद्धातून हत्या झाली होती. लष्करे हत्या प्रकरणी ॲड. रियाज पठाण १२ डिसेंबर २०१२ रोजी जिल्हा न्यायालयात साक्ष झाली. ॲड. पठाण यांना सरकारी पक्षाने फितूर घोषित केले. त्यामुळे लष्करे टोळीशी संबंधित सदस्यांना राग आला होता. त्यांनी पठाण यांच्या खुनाचा कट रचला.

ॲड. पठाण हे १६ सप्टेंबर २०१३ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उपनिबंधक कार्यालयाच्या आवारात एका झाडाखाली दस्त नोंदविण्यासाठी बसले होते. त्यावेळेस मोहन लष्करे, रामेश्वर गाढे, चौरंगीनाथ लष्करे यांनी ॲड. पठाण यांचे दोन्ही हात धरले. पवन नरुल्ला, सचिन चव्हाण, सादिक शेख हे प्रवीण खरचंद याला गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडण्यासाठी ओरडून सांगत होते. ॲड. पठाण यांच्या पाठीमागून प्रवीण याने तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर आरोपी पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्रवीण याला पिस्तुलासह ताब्यात घेतले. असिफ पठाण आणि असिफ शेख यांनी एका सरकारी वाहनातून ॲड. पठाण यांना नेवासे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अहिल्यानगरला पाठविण्याचा सल्ला दिला. नोबेल रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला. असिफ पठाण यांच्या फिर्यादीवरून नेवासे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे २९ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असिफ पठाण आणि असिफ शेख, तसेच शवविच्छेदन करणारे डॉ. कैलास झिने यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. आरोपीच्या वतीने बचावाचे तीन साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय पुरावे आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सात जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. विशेष सरकारी वकील निकम यांना ॲड. परिमल फळे यांनी सहाय केले.
------------
चौकट
सबळ पुराव्याअभावी पाच निर्दोष
या खटल्यात पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. अशोक जालिंदर जगताप, सत्यवान धनराज सानकांबळे ऊर्फ लष्करे, विलास पोपट जिरे, सोपान भगवान गाढे, सुनील ऊर्फ सोन्या मोहन परदेशी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com