नऊ वर्षांपूर्वीची कृतज्ञता जोपासण्यासाठी रिक्षा चालकाचा 'लाखाचा' पुढाकार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harshad Narhe and Pramod Narhe

हर्षद नऱ्हे याची ही गोष्ट प्रेरणादायी आहे. त्याचे वडील प्रमोद नर्हे हे रिक्षाद्वारे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. नऊ वर्षांपूर्वीची परिस्थिती आता बदलली आहे.

Rickshaw Driver : नऊ वर्षांपूर्वीची कृतज्ञता जोपासण्यासाठी रिक्षा चालकाचा 'लाखाचा' पुढाकार!

पुणे - चौथीत शिकणाऱ्या मुलाला झालेला रक्ताचा कर्करोग... उपचारांसाठी सहा लाखांच्या खर्चाचे आव्हान... अशावेळी त्याच्या वर्गातले मुलं आणि शिक्षक ६५ हजार रुपये गोळा करून देतात.... पुढे तो मुलगा बरा होतो त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते... म्हणून त्याचे रिक्षा चालक वडील त्या शाळेला एक लाख रुपयांची देणगी जाहीर करतात... नऊ वर्षांपूर्वीची कृतज्ञता आजही त्यांच्या मनात कायम आहे.....

हर्षद नऱ्हे याची ही गोष्ट प्रेरणादायी आहे. त्याचे वडील प्रमोद नर्हे हे रिक्षाद्वारे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. नऊ वर्षांपूर्वीची परिस्थिती आता बदलली आहे. हर्षद हा सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये बीसीएच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. प्रमोद यांच्या आता दोन रिक्षा आणि एक मारुती व्हॅन आहेत. त्याद्वारे ते शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतात.

हर्षद आजारी असताना नवीन मराठी शाळेतील त्याच्या वर्गातील मित्रांनी आणि शिक्षकांनी केलेली ६५ हजार रुपयांची मदत आजही त्यांच्यासाठी मोलाची आहे. आता आपली परिस्थिती सुधारलीआहे, त्यामुळे समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, या भावनेतून हर्षदच्या वाढदिवसाच्या (१३ डिसेंबर) निमित्ताने प्रमोद यांनी, नवीन मराठी शाळेला एक लाख रुपयांची देणगी देण्याचे ठरविले. पण आज पुणे बंद असल्यामुळे ही देणगी ते बुधवारी (ता. १४) शाळेला देणार आहेत. त्या वेळी हर्षदच्या पाच शिक्षकांचाही ते सत्कार करणार आहेत.

रक्ताच्या कर्करोगातून मुलगा बरा झाला म्हणून त्यातच आनंद न मानता अशा मुलांसाठी काम करण्याचे प्रमोद यांनी ठरवले. त्यासाठी त्यांनी चार-पाच मित्रांच्या मदतीने 'प्रयास फाउंडेशन' ही संस्था पाच वर्षांपूर्वी स्थापन केली. मित्र परिवार आणि स्वतःच्या पैशातून नरे हे गरजू कर्करोग रुग्णांना पाच हजार रुपयांची मदत करतात. गेल्या चार वर्षात त्यांनी १२ मुलांना मदत केली आहे.

या घटनेबाबत 'सकाळ' शी बोलताना प्रमोद म्हणाले, 'माझा मुलगा हर्षद याला रक्ताचा कर्करोग झाला तेव्हा आम्ही घाबरलो होतो. आर्थिक परिस्थितीही बिकट होती. पंतप्रधान, मुख्यमंत्री योजना आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून सहा लाख रुपये उभे केले. देवाच्या कृपेने मुलगा बरा झाला. माझी धाकटी मुलगीही अकरावी शिकत आहे. त्यामुळेच समाजासाठी काहीतरी करायचे म्हणून माझ्या ऐपतीप्रमाणे, माझ्या बचतीमधून मी शाळेला देणगी देत आहे. गरीब मुलांना तिचा उपयोग व्हावा, ही माझी त्या मागची भावना आहे.'

हर्षद नऱ्हे - माझ्या आजारपणात वर्गातील मुले आणि शाळेतील शिक्षकांनी केलेल्या मदतीमुळेचे मी बरा होऊ शकलो. ९ वर्षांपूर्वी त्यांनी केलेली मदत अजूनही आमच्या सगळ्यांसाठी मोलाची आहे. ज्या शाळेने साथ दिली, त्यांच्यासाठी काही तरी करणे आम्ही कर्तव्यच समजतो. या अनुभवातूनच आम्ही आता कॅन्सरग्रस्त लहान मुलांसाठी काम करण्याचे ठरविले आहे.