esakal | रिंगरोडची मोजणी विक्रमी वेळेत पूर्ण होणार
sakal

बोलून बातमी शोधा

Ring Road

रिंगरोडची मोजणी विक्रमी वेळेत पूर्ण होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) (MSRDC) हाती घेतलेल्या पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या (Ringroad) मार्गिका मोजणीचे काम (Counting Work) अंतिम टप्प्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत मोजणीचे काम पूर्ण करून जमिनीच्या मूल्यांकनाचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांत पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या मोजणीचे काम पूर्ण करण्याचा नवा विक्रम एमएसआरडीसीच्या नावावर नोंदविला जाणार आहेत. (Ring Road Count will be Completed in Record Time)

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. या रिंगरोडचे पूर्व व पश्‍चिम असे दोन टप्पे आहेत. पूर्व रिंगरोड उर्से (ता. मावळ)- केळवडे (ता. भोर) असा आहे. पूर्व रिंगरोड हा मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांतून जाणार आहे. पश्‍चिम रिंगरोडला केळवडेपासून सुरुवात होणार असून हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे.

हेही वाचा: पर्यटनासाठी खडकवासल्यापुढे जाण्यास बंदी; पोलिसांचा बंदोबस्त

भूसंपादनासाठी रिंगरोडच्या पश्‍चिम भागातील मार्गिकेच्या मोजणीच्या कामाला २१ एप्रिल रोजी सुरूवात झाली. पश्‍चिम भागातील चार तालुक्यांतील ३७ गावांतून हा रिंगरोड जाणार आहे. त्यासाठी सुमारे ६९५.१०९९ हेक्टर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. आतापर्यंत सुमारे ३२ गावांतील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. ३१ जुलैपर्यंत उर्वरित गावांचे मोजणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर भूसंपादन करावयाच्या जागेचे मूल्यांकन निश्‍चित करणार आहे. एकीकडे मोजणीचे काम सुरू असताना दुसरीकडे मार्गिकेचे रेखांकन (आराखडा) करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे तीन महिन्यांत ६९५ हेक्टर जागेची मोजणी पूर्ण करण्याचा नवा विक्रम एमएसआरडीसी आणि भूमी अभिलेख विभागाच्या नावे नोंदविला जाणार आहे.

पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या मोजणीचे काम जुलै अखेर पूर्ण झाल्यानंतर पूर्व भागातील रिंगरोडच्या मोजणीच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. पूर्व भागातील मोजणीचे काम दोन ते तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन केल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले.

पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चार तालुक्यांतील ३७ गावांतून हा रिंगरोड जाणार आहे. त्यापैकी ३२ गावांतील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. या महिन्याअखेरपर्यंत १०० टक्के मोजणी पूर्ण करणार आहे.

- संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी, एमएसआरडीसी

मोजणी पूर्ण झालेली गावे

पिंपळोली, केमसेवाडी, जवळ, पडळघर वाडी, रिहे, घोटावडे, मातेरेवाडी, अंबटवेट, भरे, केसरआंबोली, उरवडे, आंबेगाव, काटेवाडी, सांगरून, मांडवी बुद्रुक, मालखेड, वरदाडे, खांबगाव मावळ, घेरा सिंहगड, मोरडवाडी, रांजणे कुसगाव.

loading image