आळंदीत आठ जणांच्या मृत्यूनंतरही आओ जाओ घर तुम्हारा

alandi
alandi

आळंदी (पुणे) : आळंदीत कोरोनाच्या प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्या दोनशेच्या जवळ पोचली आहे. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यूही झाला. मात्र, तरीही आळंदीत लग्नकार्ये आणि इंद्रायणीत अस्थी विसर्जन बिनधास्त होत आहे. परवानगी कोण देतो आणि कारवाई कोणी करायची, याबाबत पोलिस व पालिकेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. 

आळंदीत आतापर्यंत कोरोनाचे 189 रुग्ण आढळले  असून, त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे.  तर, 161 जण बरे होऊन घरी परतले आहेत. आषाढी वारीकाळात आळंदीत वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह दहा पोलिस, पालिकेतील कर्मचारी, दोन नगरसेवकांसह कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आळंदीत प्रशासनाकडून फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड भागातून लग्नासाठी येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. विशेष म्हणजे मध्यवर्ती भागात राहत्या घरातच मंगल कार्यालये थाटल्याने बाहेर गावच्या वऱ्हाडींचा शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वावर आहे. रस्त्यावरच आडव्या गाड्या लावून वऱ्हाडी निघून जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा होतोच. रोज किमान पन्नासहून अधिक लग्नकार्य आळंदीत होत आहेत. एका लग्नात किमान शंभरहून अधिक वऱ्हाडी असतात. याचबरोबर इंद्रायणी काठी अस्थी विसर्जनासाठीही लोक येत आहेत. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी तीन-चार वाजेपर्यंत अस्थी विसर्जन केले जात आहे. धार्मिक कार्य असल्याने कोणी यावर बोलत नाहीत. बाहेरून येणाऱ्यांची तपासणी केली जात नाही. आळंदीत पालिकेकडून उपाययोजना नाही. कोविड सेंटरही सुरू नाही. रस्त्यावर औषध फवारणी नाही. पालिकेचे कर्मचारी नगरसेवक यांना कोरोना होऊनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष प्रयत्न नसल्याचे चित्र आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत आपत्ती नियंत्रणासाठी व्यवस्थापन म्हणून तातडीच्या निविदा काढून विविध औषध, सॅनिटायझर, फ्लेक्‍स, मास्क, कोरोनाग्रस्त रुग्णांचा परिसर सील करण्यासाठी लागणारे पत्रे, रस्त्यावर फवारली जाणारी जंतुनाशक पावडर, यावर गेल्या चार महिन्यात किती खर्च केला याची माहिती पालिकेने जाहीर करावी, अशीही मागणी नागरिकांकडून केली जाते. आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली वारेमाप खर्च पालिकेकडून केला जात असल्याची टीका आळंदी विकास मंचच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. 

बाहेरच्या लग्नांना बंदी आहे. पालिकेकडून अद्याप परवानगी नाही. तर अस्थी विसर्जनाबाबत तेथील पुरोहितांना नोटीस दिली जाणार आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून येणाऱ्या अस्थी विसर्जनास बंदीबाबत निर्णय घेतला जाईल. 
- अंकुश जाधव, मुख्याधिकारी 

लग्नाची परवानगी पोलिसांनी अद्याप दिलेली नाही. याउलट पालिका परवानगी देत आहे. यापूर्वी चोरून लग्न लावणाऱ्यांवर कारवाई केली आहे. 
- रवींद्र चौधर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आळंदी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com