बारामतीत पावसाचे धुमशान, नदी- नाल्यांना पूर 

सोमनाथ भिले
Thursday, 10 September 2020

डोर्लेवाडीसह परिसरातील गुनवडी, पिंपळी, मेखळी, झारगडवाडी, सोनगाव आदी गावांना काल रात्री मुसळधार पावसाने झोडपले. तब्बल दोन तास जोराचा पाऊस झाल्याने कऱ्हा नदीसह ओढ्यांना पूर आला आहे.

डोर्लेवाडी (पुणे) : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी परिसरात काल (ता. 9) झालेल्या मुसळधार पावसाने नदी- नाल्यांना पूर आला असून, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डोर्लेवाडीसह परिसरातील गुनवडी, पिंपळी, मेखळी, झारगडवाडी, सोनगाव आदी गावांना काल रात्री मुसळधार पावसाने झोडपले. तब्बल दोन तास जोराचा पाऊस झाल्याने कऱ्हा नदीसह ओढ्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदीपलीकडील शेतकऱ्यांचे मोठी गैरसोय झाली आहे. तसेच, सोनगाव ते मेखळी व डोर्लेवाडी ते मेखळी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. गेली सलग तीन दिवस झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी शेतीचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष, केळी, डाळिंब आदी फळबागांसह बाजरी, मका, कडवळ, भाजीपाला आदी नगदी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

कोरोनाबाधितांसाठी कॅशलेस सेवा, पण लूट सुरूच

पाऊस व जोरदार वारे असल्यामुळे उभी पिके भुईसपाट झाली आहेत. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या आहेत. बारामती- वालचंदनगर रस्त्यावर सोनगाव हद्दीत बाभळीचे झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक बंद होती. काही घरांचे देखील नुकसान झाले आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे प्रशासनाने या भागातील शेतीचे व घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The river in Baramati taluka was flooded due to heavy rains