नदीपत्रातील रस्त्याचे काम वेगात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पिंपरी - महापालिकेच्या वतीने काळेवाडी पुलापासून चिंचवड येथील यशोपुरम सोसायटीला जोडणाऱ्या व सुमारे नऊ कोटी ३३ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम सुरू आहे. चिंचवड-लक्ष्मीनगर येथे कामाला वेग आला असून काम पूर्ण झाल्यावर लिंक रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. 

पिंपरी - महापालिकेच्या वतीने काळेवाडी पुलापासून चिंचवड येथील यशोपुरम सोसायटीला जोडणाऱ्या व सुमारे नऊ कोटी ३३ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम सुरू आहे. चिंचवड-लक्ष्मीनगर येथे कामाला वेग आला असून काम पूर्ण झाल्यावर लिंक रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. 

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहराच्या अंतर्गत भागात काही ठिकाणी कमी वेगाने वाहतूक होते. त्यामुळे शहराच्या अंतर्गत भागात रस्त्याची कामे करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून काळेवाडी पुलापासून चिंचवड येथील यशोपुरम सोसायटीपर्यंत रस्त्याचे १८ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. या कामाचा जानेवारीत आदेश दिला होता. फेब्रुवारीत कामाला सुरवात झाली. जुलै २०१९ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. सुमारे १.७ किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. या रस्त्यात दोन मोठे नाले आहेत. या नाल्यांवर १० ते ११ मीटर उंचीची काँक्रीटची भिंत उभारण्यात येणार आहे. त्यापैकी एका नाल्यावरील भिंतीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या भिंतीवर स्लॅब टाकण्यात येईल. या दोन्ही नाल्यांच्या कामासाठी प्रत्येकी सुमारे दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर तानाजीनगर, केशवनगर या भागातील नागरिकांना थेट पुणे-मुंबई महामार्गाकडे जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बचत होईल. त्याचप्रमाणे चिंचवडगावातील गुरुकुलम येथेही बटरफ्लाय ब्रिजचे काम सुरू आहे. याचे काम पूर्ण झाल्यावर डांगे चौकाकडून लिंक रस्त्याकडे येणाऱ्या वाहतुकीचा ताण कमी होईल. चिंचवडगावातील चापेकर चौक, चिंचवड स्टेशनकडे जाणाऱ्या वाहतुकीचा ताणही कमी होईल.

रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराला १८ महिन्यांची मुदत दिली आहे. त्यात काही अडचणी आहेत. मात्र, ठेकेदाराकडून दिलेल्या वेळेत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
- प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता, ब प्रभाग

Web Title: River Road Work