वाहनचालकांनो सावधान, वरंधा घाटात दरड कोसळली...  

विजय जाधव
शुक्रवार, 3 जुलै 2020

भोर- महाड मार्गावरील वरंधा घाटात दरड कोसळल्यामुळे रस्त्याच्या दरीच्या बाजूकडील संरक्षक कठडा ढासळला आहे.

भोर (पुणे) : भोर- महाड मार्गावरील वरंधा घाटात दरड कोसळल्यामुळे रस्त्याच्या दरीच्या बाजूकडील संरक्षक कठडा ढासळला आहे. गुरुवारी (ता. २) रात्री किंवा शुक्रवारी (ता. ३) पहाटे घाटमाथ्यावरील वाघजाई मंदिराजवळ भोर बाजूकडे सुमारे २०० मीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. 

कोरोनामुळे अनेक व्यवसाय अडचणीत, पण हा व्यवसाय तेजीत

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे भोरचे उप अभियंता आर. एल. ठाणगे यांनी माहिती दिली की, संरक्षक कठडा ढासळल्याबाबत शुक्रवारी सकाळी माहिती मिळाली. त्यानंतर लगेच शाखा अभियंता शिवानंद हल्लाळे व तांत्रिक सहायक गौतम कांबळे यांनी कर्मचा-यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेले दरडीचे दगड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. घाटामाथ्याच्या डोंगराच्या कड्यावरून भला मोठा दडग खाली पडला. परंतु, दगड रस्त्याच्या संरक्षक कठड्यावर पडल्यामुळे जुन्या बांधकामाचा असलेला कठड्याच्या काही भाग कोसळला गेला. त्यामुळे सुमारे चार फूट रस्ता खचला गेला. सध्या तेथे १५ फुटांचा रस्ता शाबूत आहे. त्यामुळे वाहतुकीस सध्या तरी अडथळा नाही. परंतु, पावसाचे प्रमाण वाढल्यास तेथे अपघाताचा धोका संभविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनामुक्त रुग्ण घरी परतल्यावर स्वागत करताय तर... 

सध्या कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात वरंधा घाटातून जाणारी एसटी व शासकीय वाहतूक बंद आहे. मात्र, तरकारी व इतर नैमित्यिक वाहतूक सुरू आहे. याशिवाय घाटातील पावसाळी निसर्गसौदर्यांचा आनंद लुटण्यासाठी काही पर्यटक येऊ लागले आहेत. त्यामुळे घाटातील वाहतूक काही प्रमाणात सुरु आहे. मात्र, घाटात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी घाट रस्त्यात थांबू नये आणि वाहने चालविताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The road in Wardha Ghat was eroded