esakal | पुण्याचे रस्ते झाले ‘डर्ट ट्रॅक’
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पुण्याचे रस्ते झाले ‘डर्ट ट्रॅक’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : चारीचाकी गाडीची एका बाजूची चाके रस्त्यावर आणि दुसऱ्या बाजूची चाके खड्ड्यात अशा ‘डर्ट ट्रॅक’ वरून गाडी तुम्ही कधी चालवली आहे का? तुम्हाला याचा अनुभव घ्यायचाय? तर मग गाडी घेऊन या शनिवारवाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एच. व्ही. देसाई महाविद्यालयाच्यासमोरील रस्त्यावर! तुम्हाला तेवढा वेळ नसेल, तर शहराच्या मध्यवस्तीतील पेठांमधील कोणत्याही रस्त्यावर तुम्हाला ‘डर्ट ट्रॅक’चाच अनुभव येईल.

महापालिका आणि त्यांचे जावई असलेले ठेकेदार यांनी ही व्यवस्था ‘खास’ पुणेकरांसाठी केली आहे. तुम्ही लवकर येऊन हा अनुभव घ्या, कारण यावरून महापालिकेच्या ‘मालकांनी’ प्रशासनाला धारेवर धरत रस्ते दुरुस्ती करण्याची तंबी दिली. प्रशासनाने मात्र अजूनही ती मनावर घेतलेली नाही. अधिकाऱ्यांच्या मनात आले तर कदाचित या आठवड्यात ‘हा’ अनुभव घेण्याची संधी गमवावी लागेल!

पुण्यात दुसऱ्या लॉकडाउनमध्ये महापालिकेने लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता यासह शहराच्या मध्यवस्तीतील अंतर्गत रस्त्यांवर विविध विकासकामांसाठी खोदाई केली. ड्रेनेज लाइनसह विविध विकासकामांचा त्यात समावेश होता. ही कामे करणाऱ्या ठेकेदारांवरच रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी दिली होती. तर रस्ते नियमानुसार पूर्ववत होत आहेत की, नाही ही गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी पथविभागाची होती. पण ठेकेदार ठरले महापालिकेचे ‘जावई’! त्यांना जाब कसा विचारणार असा, प्रश्न अधिकाऱ्यांना पडला असावा. त्यातून पुणेकरांना ही ‘संधी’ मिळाली आहे.

खणलेल्या रस्त्यांची कामे करण्यासाठी पुन्हा निविदा काढण्यात येत आहेत. त्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच शहरातील खणलेले रस्ते पूर्ववत होतील.

- व्ही. जी. कुलकर्णी, पथविभागप्रमुख, महापालिका

पेठांमधील रस्त्यांवरून चारचाकीच नाही, तर दुचाकी चालवितानाही अक्षरशः अंगावर काटा येतो. आतापर्यंत गर्दी, वाहतूक कोंडी होती. पण आता वर-खाली झालेल्या रस्त्यांची भर पडली आहे.

- सचिन पाटील, सदाशिव पेठ

loading image
go to top