‘इंटरनेट हॅंडलिंग चार्जेस’च्या नावाखाली चित्रपटाच्या ऑनलाइन तिकीट बुकिंगमधून लूट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

सर्व पैसा जातो कुठे?
इंटरनेट हॅंडलिंग चार्जेसच्या नावाखाली उकळला जाणारा पैसा हा ऑनलाइन तिकीट ॲप कंपन्यांना जमा होत आहे. कोणत्याही बॅंकेच्या क्रेडिट व डेबिट कार्डवरून हे शुल्क वजा होत आहे. वास्तविक हे वजा झालेले शुल्क चित्रपटगृहांनी देणे अपेक्षित आहे. मात्र यावर बॅंकांचाही वचक नाही. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष विजय सगर म्हणाले, ‘‘इंटरनेट हॅंडलिंग चार्जेसच्या नावाखाली पैसे उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. वास्तविक हे शुल्क चित्रपटगृहांनी भरणे आवश्‍यक आहे. याविषयी अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. मात्र आता सरकारला या कंपन्याविरोधात लेखी पत्र देणार आहोत. यातही पारदर्शकता असणे आवश्‍यक आहे. कंपन्यांची ही मोनोपॉली आहे. डिजिटलच्या नावाखाली नागरिकांची लूट सुरू आहे.’

पिंपरी - वेळेची बचत आणि रांगेत उभे राहण्यापेक्षा विविध ॲपच्या माध्यमातून चित्रपटप्रेमी ऑनलाइन तिकीट बुक करतात. मात्र त्यांना तिकीट दराच्या व्यतिरिक्त ‘इंटरनेट हॅंडलिंग चार्जेस’च्या नावाखाली दहा टक्के भुर्दंड सहन करावा लागतो. या अतिरिक्त शुल्कासाठी कोणतीही अधिकृत नियमावली नसताना नागरिकांची दिशाभूल करून खासगी कंपन्यांकडून आर्थिक लूट केली जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात युवा वर्गाकडून चित्रपटाचे ऑनलाइन तिकीट बुक करण्याकडे कल वाढत आहे. यातून बुकिंग करणाऱ्या कंपन्यांना लाखो रुपयांची कमाई होत आहे. सजग नागरिक मात्र चित्रपटगृहात याविषयी आवाज उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र नेमकी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्‍न नागरिकांसमोर आहे. इंटरनेट हॅडलिंग चार्जेसची कोणतीही अधिकृत शासकीय नियमावली नाही. प्रत्येक तिकीट बुकिंगच्या मागे ऑनलाइन दहा टक्के रक्कम खासगी कंपन्यांकडून आकारली जात आहे. याशिवाय प्रत्येक चित्रपटगृहात तिकिटाचे दरही वेगवेगळे आहेत. त्यामुळे इंटरनेट हॅंडलिंग चार्जेसही वेगवेगळे आकारले जात आहेत. यासाठी ठराविक शुल्क नाही.

Video : बारावी परीक्षेसाठी ‘सकाळ’चे मार्गदर्शन

ऑनलाइन बुकिंग इंटरनेट जादा शुल्क आकारण्याविरोधात ग्राहकांनी समोर येऊन आवाज उठविणे अपेक्षित आहे. ऑनलाइन कंपन्या या माध्यमातून बक्कळ पैसा कमवत आहेत. रसिकांना जादा पैशाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. ग्राहकांना सुविधा हव्या आहेत; मात्र या सुविधांचा गैरवापर नको. एकीकडे डिजिटल इंडियाकडे वाटचाल हवी, असा नारा दिला जातो. दुसरीकडे लूट सुरू आहे. चित्रपटगृहांकडे याकरिता स्वत:ची सक्षम यंत्रणा हवी. सध्या या ऑनलाइन बुकिंगवर कोणाचेही नियंत्रण नाही.
- बाळासाहेब गोरे, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ, संस्थापक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery from booking movie tickets online under the name of Internet handling charges